नंदुरबार l प्रतिनिधी
बालिकेचा विनयभंग करणा-या आरोपीस न्यायालयाने 12 वर्षे एक महिना कारावासाची शिक्षा व 4 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
धडगाव पोलीस ठाणे हद्दीत राहणा-या 15 वर्षीय अल्पवयीन पिडीत बालिका हिचा आरोपी पंकज आमदा पावरा, वय-32, रा. बोरवण ता. धडगाव जि. नंदुरबार हा वेळोवेळी पाठलाग करीत असे, पिडीत ही दि. 14/08/2018 रोजी सकाळी विहीरीवरुन पाणी घेऊन येत असतांना आरोपी याने पिडीत बालिकेचा हात पकडून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व त्याचे घराजवळ अडवून बालिकेस लाकडी दांडक्याने दुखापत केल्याप्रकरणी धडगाव पोलीस ठाणे येथे भा.द.वि.क. 354,354 (अ), (ड),341,324,509 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 प्रमाणे गुन्हा नोंदविला होता. व सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपी यास तात्काळ अटक करण्यात आली होती.
धडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय भामरे यांनी सदरचा गुन्हयाचा तपास पोउपनि-एस.व्ही. दहीफळे यांचेकडे दिला. पोउपनि-दहीफळे व त्यांचे सहकारी पोलीस यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी याचे विरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र अति. सत्र न्यायाधीश, शहादा यांचे न्यायालयात सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी अति. सत्र न्यायाधीश, सी.एस. दातीर यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीत बालिका वय-15 वर्षे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पिडीत बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने अति. सत्र न्यायाधीश, शहादा यांनी गुन्हयातील आरोपी पंकज आमदा पावरा, वय 32, रा. बोरवण ता.धडगाव जि. नंदुरबार यास 12 वर्ष एक महिना कारावासाची व रुपये 4 हजार रु. दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. वाय.बी.मोरे यांनी काम पाहिले होते. तसेच पैरवी अधिकारी पोउपनि सागर नांद्रे, पैरवी अंमलदार पोहेकॉ परशुराम कोकणी व पोशि देविदास सुर्यवंशी, यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी अभिनंदन केले आहे.