नंदुरबार l प्रतिनिधी-
युवा, महिला, बेरोजगार आणि श्रमिक यांच्यासह प्रत्येक घटकासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारने राबवलेले जनकल्याणाचे कार्य घराघरापर्यंत पोहोचवू या आणि फिर एक बार मोदी सरकार हा नारा सत्यात उतरवून देशाचे लाडके नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करूया, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार महा संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केले.
दिनांक सहा एप्रिल 2024 रोजी नंदुरबार येथे भारतीय जनता पार्टीच्या विजय पर्व या प्रमुख कार्यालयात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी हे आवाहन केले. याप्रसंगी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते सर्वप्रथम भारत माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या ध्वजाला वंदन करण्यात आले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, डॉ.सपना अग्रवाल सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी भाजपा जेष्ठ व जुने कार्यकर्ते शंकरलाल अग्रवाल, संजय साठे, प्रकाश चौधरी, माणिक माळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.