नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रनायक विर शिरोमणी महाराणा प्रताप तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे विद्यापीठच आहे या विद्यापीठात जे शिकतील तो माणूस म्हणून मोठा होईल,असे प्रतिपादन शिवाव्याख्याते राजा महाराज शेंडे यांनी केले ते हिंदु सेवा सहाय्य समितीचा तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित गाथा वीर हिंदु योद्धांची या कार्यक्रमात बोलत होते.
डॉ काणे गर्ल्स हायस्कूल मैदानावर रविवारी आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचा प्रारंभ घोषणा, प्रेरणामंत्राने झाली. व्यासपीठावरील वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह, छ शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांचा प्रतिमेचे पूजन आणि मशाल प्रज्वलित करून राजा महाराज शेंडे आणि हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील यांनी सुरुवात केली. प्रमुख वक्ते राजा महाराज शेंडे यांचा सत्कार पंकज डाबी यांनी केला. डॉ नरेंद्र पाटील यांनी कार्यक्रम आयोजन महत्व तसेच हिंदु सेवा सहाय्य समितीचा कार्य आढावा प्रास्ताविकातुन मांडला.
प्रमुख वक्ते राजा महाराज पुढे म्हणाले की, महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू धर्माचा, आपल्या स्वाभिमानाचा जागर घडविला त्यामुळे ते माणूस म्हणून राजा म्हणून एक आदर्श व्यक्ती घडले राष्ट्रमाता जिजाऊ ने छत्रपती संभाजी व छत्रपती शिवाजी महाराजांना या पवित्र भूमी पुन्हा एकदा स्वर्ण सिंहासन संस्थापित करण्याचे शिकवण व शिक्षण दिले. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्रोत विर शिरोमणी महाराणा प्रताप होते. ज्या घरात महापुरुषांच्या चरीत्राचे वाचन होते ते घर राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असते ही जमेची बाजू आहे. राम राज्य आदर्श करण्यामागे वशिष्ठ गुरु होते तर तर शिवराज्य आदर्श करण्यामागे जिजाऊ चा आशीर्वाद होता. शस्त्र आणि शास्त्र जेव्हा एकत्र येते तेव्हा आदर्श राज्य निर्माण होते .
महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराजांनी एकापेक्षा अनेक सरस मावळे निर्माण केले. अनेक वंशात व जातीजातीत आत्मविश्वास निर्माण केला. महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराजांचे हे राज्य धर्मराज्य होते कारण या धर्म राज्यात अठरापगड जातीचा समावेश होता .त्रेता युगातील भगवान श्री रामचंद्र यांचे चरित्र व्दापर युगातील भगवान श्रीकृष्ण यांची राजनीती ज्या व्यक्तिमत्वामध्ये एकवटली होती ते व्यक्ती म्हणजे कलियुगातील विर शिरोमणी महाराणा प्रताप व पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज. जे राष्ट्र, जो समाज आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, ऐकत नाही त्यातून काही बोध घेत नाही, ते राष्ट्र, तो समाज विश्वाच्या संघर्षात वाचत नाही, टिकत नाही.
ज्या राष्ट्राचा इतिहास आपल्याला माहीत नाही ज्या राष्ट्रपुरुषाचा इतिहास आपल्याला माहीत नाही ते राष्ट्र लवकर रसातळाला जाते. म्हणूनच राष्ट्र पुरुषांची गाथा आपल्या शरिराच्या नसानसात एकवटली पाहिजे असे सांगून सर्व हिंदूंनी संघटीतपने हिंदुराष्ट्र स्थापनेचा कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी भारतीय सैन्य दलात निवड झालेले मयुर तांबोळी आणि श्रध्दा अमृतकर यांचा सत्कार प्रमुख वक्ते हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तुषार ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन शितल वैष्णव यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीच्या धर्मसेवकांनी परिश्रम केले.