नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार तथा विद्यमान खा. डॉ. हिना गावित यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांची 28 मार्च 2024 रोजी प्रत्यक्ष भेट घेतली आणि निवडणूक जिंकण्यासाठी आशीर्वाद घेतले. याप्रसंगी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉक्टर विजयकुमार गावित हे देखील उपस्थित होते.
याविषयीचे वृत्त असे की, धडाकेबाज कार्यपद्धती राबवून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात खा. डॉ. हिना गावित यांनी सर्वांगीण विकास घडवला असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच खासदारकीच्या माध्यमातून इतक्या संख्येने लोकोपयोगी कामे झाली आहेत. असे असताना गावित परिवाराच्या विरोधातील काही नेत्यांनी एकत्र येऊन खासदार डॉक्टर हिना गावित यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांकडे मागणी केली होती.
परंतु महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केलेल्या विकास कार्याला महत्त्व देत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी खासदार डॉक्टर हिना गावित यांना सलग तिसऱ्यांदा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खासदारकी लढवण्याची संधी दिली असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर हिना गावित यांनी भाजपाचे प्रदेश नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष मुंबई येथे जाऊन दिनांक 28 मार्च 2024 रोजी प्रत्यक्ष भेट घेतली आणि निवडणूक जिंकण्यासाठी आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित हे देखील उपस्थित होते. खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभा निवडणूकीत पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. नंतर मतदार संघातील स्थिती विषयी थोडक्यात चर्चा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार डॉक्टर हिना गावित यांना शुभेच्छा दिल्या.