नंदुरबार l प्रतिनिधी
पोलीस ठाण्यातील 13 लोकांची प्रतिबंधक कारवाई कमी करण्यासाठी 3 हजाराची लाच घेतल्या प्रकरणी तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार यांच्या सह एकास अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की,तक्रारदार व त्यांच्या गावातील इतर १२ अशा एकुण १३ लोकाविरूध्द विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिष्टर नंबर ३४६/२०२३, भा.दं.वि. कलम ३२३, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ वैगरे गुन्हा दाखल होता. नमुद गुन्हा दाखल झाल्यानंतर विसरवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी तक्रारदार व इतर १२ अशा एकुण १३ लोकांना प्रतिबंधक कारवाई करणेकामी दि.०२/११/२०२३ रोजी नवापुर तहसिल कार्यालय येथे समक्ष घेऊन गेले होते. त्यावेळी तहसिल कार्यालय, नवापूर येथील खाजगी इसम हनु रामा वळवी यांनी ते स्वतः तहसिल कार्यालय, नवापूर येथे फौजदारी लिपीक असल्याचे भासवून साहेबांकडून तक्रारदार व त्यांच्या सोबतचे इतर १२ जण अशा १३ लोकांविरूध्द दाखल गुन्हयातील प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण बंद करून देण्यासाठी प्रत्येकी १ हजार रू. प्रमाणे १३ लोकांचे एकुण १३ हजार रूपयांची प्रथमतः लाचेची मागणी करून, तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडुन १० हजार रू. घेण्याचे मान्य करून लाचेची मागणी केली.
यापैकी ७ हजार रूपये आरोपी खाजगी इसम याने अगोदरच तक्रारदार यांच्याकडुन घेतले असल्याने उर्वरीत ३ हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याचे दि.०९/११/२०२३ रोजी पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले होते. तसेच मागणी केलेली लाचेची ३ हजार रूपये आरोपी खाजगी इसम याने २१/११/२०२३ रोजी १३:३५ ते १३.४३ वाजेचे दरम्यान तहसिल कार्यालय नवापुर येथील महसुल शाखेत पंचासमक्ष स्विकारलेनंतर लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्याचेविरूध्द् नवापुर पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. ५८४/२०२३ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ (अ) सह भा.दं.वि.कलम १७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर नमुद गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपी लोकसेवक १. महेश कौतिकराव पवार, तहसीलदार नवापुर, २. जितेंद्र जयसिंग पाडवी, निवासी नायब तहसीलदार, नवापुर व ३. अमृत चंद्रसिंग वळवी, महसुल सहाय्यक, (फौजदारी लिपीक) तहसील कार्यालय नवापुर अशा तिन्ही लोकसेवकांनी आरोपी खाजगी इसम हनु रामा वळवी यास गुन्हयातील तक्रारदार यांच्याकडुन लाच मागणी करून मागीतलेली लाचेची रक्कम स्विकारण्याच्या अपराधास प्रोत्साहन दिल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने यातील आरोपी लोकसेवक १) महेश कौतिकराव पवार, तहसीलदार नवापुर, व २) जितेंद्र जयसिंग पाडवी, निवासी नायब तहसीलदार, नवापुर यांना दिनांक २६/०३/२०२४ रोजी २२:४८ वाजता गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने अटक करण्यात आलेली आहे.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक, श्रीमती शर्मिष्ठा पारगे वालावलकर, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक, अग्पर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी. ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक, व नरेंद्र पवार, पोलीस उपअधीक्षक (वाचक), ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलोस उपअधीक्षक राकेश चौधरी व अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार पथकाने केली आहे.
याव्दारे नंदुरबार जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यांत येते की, कोणत्याही शासकीय/ निमशासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी/कर्मचारी किंवा त्याचे वतीने इतर खाजगी इसम लाचेची मागणी करीत असतील, तर अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार कार्यालयाशी दूरध्वनी नंबर (०२५६४) २३०००९, व टोल फ्री क्र. १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार यांनी केले आहे.