शहादा l प्रतिनिधी
लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणी कमलनगर उंटावद-होळ ता.शहादाच्या चेअरमनपदी दीपकभाई पाटील तर व्हाईस चेअरमनपदी हरीदास सदाशिव पाटील (त-हाडी तबो.)यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकशाही आघाडीचे उमेदवार सर्व 21जागांवर निवडून आले आहेत.शनिवारी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी सूतगिरणी साईटवर विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी चेअरमनपदी सर्वानुमते दीपकभाई पुरुषोत्तम पाटील यांची तर पहिल्या वर्षी व्हाईस चेअरमनपदी हरीदास सदाशिव पाटील यांची निवड करण्यात आली.दरवर्षी संचालकामधून व्हाईस चेअरमन निवड करण्यात येणार असून तसे अधिकार चेअरमन दीपकभाई पाटील यांना देण्यात आले आहेत.
यावेळी झालेल्या विजयी सभेस सुरत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनीलभाई पटेल, गुजरात गुर्जर महासभेचे जगदीश पाटील (निझर), पंचायत समितीचे सभापती विरसिंग ठाकरे, माजी सभापती माधवकाका पाटील, उद्धवभाई पाटील, सातपुडा कारखान्याचे व्हॉईस चेअरमन प्रेमसिंग अहेर, स्वाभिमानी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष घनश्याम चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, माजी कृषी सभापती डॉ. भगवान पाटील, माजी सदस्य महेंद्र पाटील (सामळदे), मंदाणेचे माजी उपसरपंच अनिल भामरे, महावीर पतसंस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र जैन, बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, माजी उपसभापती रवींद्र रावल, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा. मकरंद पाटील, माजी चेअरमन राजाराम पाटील, विजय विठ्ठल पाटील,व्हाईस चेअरमन अरविंद पाटील, ईश्वर भूता पाटील शेल्टी, आनंदराव पाटील डोंगरगाव, जयप्रकाश पाटील मोहिदा, सूतगिरणीचे माजी व्हॉईस चेअरमन जगदीश पाटील, डॉ. ओंकार पाटील, गिरधर पाटील, प्रकाश पाटील, माजी संचालक ईश्वर मंगेश पाटील, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, पुरुषोत्तम पतपेढीचे अध्यक्ष सुनील पाटील,लोणखेडा उपसरपंच संजय पाटील, माजी उपसरपंच अशोक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, मोतीलाल जैन आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यमान चेअरमन बापूसाहेब दीपकभाई पाटील, व्हॉईस चेअरमन हरिदास पाटील आणि सर्व विद्यमान व माजी संचालकांचा सत्कार करण्यात आला.
पुन्हा लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर बोलतांना दीपकभाई पाटील म्हणाले, सर्वदूर सूतव्यवसाय व सहकार क्षेत्रात समस्या निर्माण झाल्याचे सर्वज्ञात आहे.आपली सूतगिरणी सद्यस्थितीत आर्थिक अडचणीतून जात आहे. अशाही परिस्थितीत सभासदांनी लोकशाही आघाडीवर विश्वास ठेवत सर्वच 21 संचालक निवडून दिले आहेत. प्रचारादरम्यान विरोधकांकडून अनेक आरोप झाले.
मात्र सुनियोजित व शिस्तबद्धपणे सभासदांशी संपर्क साधल्याने आपला 100% विजय झाला आहे. आपण एकत्रितपणे एकविचाराने निवडणुकीला सामोरे गेलो म्हणूनच प्रतिकूल परिस्थितीतही यश प्राप्ती झाली आहे.शेतकरी सभासदांनी पुनश्च आपल्यावर विश्वास टाकला असून परिसर विकास व सहकार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू. सूतगिरणी सुरू करण्यासह शेतकरी सभासद व संबंधित सर्वांची देणे देण्यासाठी आपण बांधील आहोत. सहकारात काम करणाराच चुकतो. चुकीतून योग्य बोध घेऊन पुढे वाटचाल करण्यातच खरे यश असल्याचेही त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन माजी संचालक के. डी. पाटील यांनी केले.आभार प्रा. मकरंद पाटील यांनी मानले. यावेळी लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीचे आजी-माजी संचालकांसह विविध सहकारी संस्थांचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.