नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर आज दि. ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजेला आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकल्याचे बोलले जात आहे.अचानक टाकलेल्या या धाडीमुळे एकच खळबळ उडाली कारखान्याचे मालक राज्याचे उममुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.नेमकी पथकाकडून काय चौकशी करण्यात आली हे समजू शकले नाही. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत चौकशी सुरू असल्याचे समजले.
राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या मालमत्तेबाबत भाजपाचे किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरुन चौकशी सुरू झाल्या आहेत.आज राज्यात पाच ठिकाणी कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्या.या धर्तीवर नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एल.एल.पी साखर कारखान्यावर आज दि. ७ ऑक्टोंबर रोजी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. सदरची धाड का टाकण्यात आली? नेमकी काय चौकशी करण्यात आली? ते समजू शकले नाही. साखर कारखान्याचे गेट बंद केल्याने आतमध्ये जाण्यास कोणालाही परवानगी देण्यात आली नाही.चौकशीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचे समजले. नंदुरबार तालुक्यातील समशेरपुर येथे पुष्पदंतेश्वर साखर कारखाना सन १९९६ मध्ये सुरू करण्यात आला होता.मात्र काही वर्षानंतर कारखाना अडचणीत आल्याने व कर्जाचा बोजा वाढत असल्याने शासनाने हा कारखाना अवसायनात काढून विक्री केला. कारखान्याचे मालक श्री. शिंगारे यांनी कारखान्याचे नाव बदलून आयान मल्टीट्रेड साखर कारखाना असे केले. कारखान्याचे मालक हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. सदर कारखान्याची मालमत्ता सुमारे १५० कोटी रूपयांची असतांना त्याची विक्री अवघ्या ४७ कोटी रूपयांत का करण्यात आली? हा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, हा कारखाना खरेदीसाठी मध्यवर्ती बँकेनेही कर्ज दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान आज आयकर विभागाची धाड पडल्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत अधिकारी कारखान्यातच असल्याने व गेट बंद असल्याने नेमकी काय चौकशी करण्यात आली हे समजू शकले नाही.सदरच्या पथकात पाच ते सात अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड पडल्यानंतर जिल्हाभर याची चर्चा होती.