नंदुरबार l प्रतिनिधी
नगर परिषद संचलित स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या माध्यमातून नंदुरबारचे नाव राज्यसह देशात ओळखले जाईल. म्हणून विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये अडकून राहण्यापेक्षा मैदानी खेळांप्रमाणेच जलतरण सरावाला प्राधान्य देण्याचे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार नगर परिषद संचलित स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव येथील विद्यार्थ्यांनी मुंबई आणि मालवण येथे झालेल्या दोन किलो मीटरच्या सागरी जलतरण स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्या .
याबद्दल माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.नंदुरबार शहरापासून लगतच्या जिल्ह्यात देखील समुद्रसपाटी नसताना नंदुरबार येथील जलतरणपटू विद्यार्थ्यांनी मुंबई आणि मालवण येथील सागरी जलतरण स्पर्धेत सहभाग नोंदविला. दोन किलो मीटरच्या जलतरण स्पर्धेत नंदुरबार येथील देव अभयसिंग राजपूत, निर्मल भूपेंद्रसिंग आरंभी आणि दर्ष मितेश शहा या विद्यार्थ्यांनी सागरी जलतरण स्पर्धेत प्रमाणपत्र आणि पदक प्राप्त केले.
या विजयी विद्यार्थ्यांसह पालकांचे देखील सर्वत्र अभिनंदन होत आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे प्रशिक्षक अमोल भोयर,राहुल काळे, संजय राजपूत, रणजीत गावित, अमित गावित यांचे मार्गदर्शन लाभले.
जलतरण स्पर्धा आणि आरोग्य दृष्टीने नागरिकांनी नगरपालिका संचलित व बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावात सरावासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन प्रशिक्षक अमोल भोयर यांनी केले आहे.