नंदुरबार l प्रतिनिधी
बंगाल येथे तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत सातत्याने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत. गेली अनेक वर्षे बंगालमधील संदेशखली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. याची दखल राज्य पोलिसांनीही घेतलेली नाही. तेथे सामान्य हिंदु नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होईल अशी स्थिती नाही, त्यामुळे तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने करण्यात आली.
या वेळी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना नंदुरबार येथे निवेदन देण्यात आले. यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे दिग्विजय ठाकरे, नरेंद्र चौधरी, योगेश विसपुते, देवबा गुरव, राहुल मोरे, हर्षल बोरसे, ओम चौधरी, हर्षल देसाई, मयुर चौधरी आणि हिंदु जनजागृती समितीचे राहुल मराठे हे उपस्थित होते.
तळोदा येथेही तहसिलदार श्री.लोखंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अमन जोहरी,पराग राणे, पारस परदेशी, कार्तिक शिंदे, चिंटू जोहरी, किरण ठाकरे, आकाश भोई, योगेश चव्हाण,पवन भोई, नंदू राजपूत हे उपस्थित होते. यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु राष्ट्र सेना, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुलींवर अत्याचार करणाऱ्या नगर जिल्ह्यातील विनियार्ड ब्लेसेड चर्चच्या पास्टरवर कठोर कारवाई करा
सोनई, तालुका नेवासा जिल्हा नगर येथील विनियार्ड ब्लेसेड चर्चच्या पास्टर सुनील गंगावणे, पास्टर उत्तम वैरागर, पास्टर संजय वैरागर यांनी अल्पवयीन दोन मुलींना तिच्या आजीला झालेला आजार बरे करण्याचे औषध देतो असे सांगत त्यांना चर्च मध्ये बोलावून सतत लैंगिक अत्याचार केला. गावातील काही सजग युवकांनी याचे चित्रीकरण केल्याने हे दुष्कृत्य बाहेर आले. त्यामुळे या तीनही पास्टरवर कठोरात कठोर कारवाई करून यांच्या चर्चमध्ये अशी दुष्कृत्ये चालतात का ? याची चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली गेली.
भिडे गुरुजी यांच्यावर आक्रमण करणाऱ्यावर कारवाई करा
नुकतेच मनमाड येथे पूज्य भिडे गुरुजी यांचे वाहन अडवून त्यावर काही समाजकंटकानी आक्रमण केले. त्यांवर कारवाई करण्यात यावी,तसेच त्यामागे कोणाचा कुटील हात आहे हे शोधून काढून त्यांनाही कारावासात डांबावे अन् गुरुजींना सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.