नंदुरबार l प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात यशवंत विद्यालय मैदान नंदुरबार येथे आज 6 मार्च पासून 10 मार्च 2024 पर्यंत रोज सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपावेतो “महासंस्कृती महोत्सवाचे” विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, कार्यक्रम यांचे आयोजन सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात येत असून राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्याजपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवाय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याठी या पाच दिवशी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी, आई व वडील, शासकीय अधिकारी, शालेय विद्यार्थी, मान्यवर व नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही श्रीमती खत्री यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.