नंदुरबार l प्रतिनिधी
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंमार्फत जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेतील 1 लाख 06 हजार 177 पात्र शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून प्रत्येक कुटूंबाला दरवर्षी एक साडी मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यातील पात्र अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येक कुटूंबाला दरवर्षी प्रती कुटूंब 355 ते 373 रुपये किंमतीची एक साडी मोफत मिळणार असल्याने दारिद्र्य रेषेखालील कुटूंबाना आधार ठरणार आहे. दरवर्षी मोफत एक साडी रेशन दुकानांमध्ये मिळणार असून सद्यस्थिती वस्त्रांचे भाव वाढल्याने सर्वसामान्य कुटूंबांची अडचण होते. याबाबत मंत्रिमंडळ निर्णय झाल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना दरवर्षीं एक साडी चा लाभ मिळणार आहे. याबाबत पुरवठा विभागाकडून वाटप सुरु असून शासकीय धान्य गोदामातून स्वस्त धान्य दुकानात साडयांचा पुरवठा करण्यात आलेला आहे.
शासन निर्णयानुसार राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणास 2023 ते 2028 या पाच वर्षासाठी मान्यता दिली आहे. या धोरणानुसार राज्यातील अंत्योदय योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारक प्रतिकुटूंब एक साडी मोफत मिळणार आहे. ज्याची किंमत खुल्याबाजारात किमान 370 ते 400 रुपयांचे आहे.
या योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, 2024 ते होळी 24 मार्च, 2024 पर्यंत मोफत साडी वाटप करण्यात येणार आहे.
कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील 1 लाख 06 हजार 177 पात्र कार्डधारक लाभार्थ्यांपैकी 8 हजार 530 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून उर्वरित 97 हजार 647 लाभार्थ्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानातून मोफत साडी प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
तालुकानिहाय साड्यांचे वितरण
• नंदुरबार : 16 हजार 779
• नवापूर : 18 हजार 514
• शहादा : 20 हजार 689
• तळोदा : 11 हजार 048
• अक्कलकुवा : 19 हजार 621
• अक्राणी : 19 हजार 526
एकूण : 1 लाख 06 हजार 177