नंदुरबार l प्रतिनिधी
भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्यात दाखल होणार आहे. दरम्यान नंदुरबारात दुपारी २ वाजता काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. तयारीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल बैठक घेतली. सभेचे ठिकाण आणि मार्ग याची त्यांनी पाहणी केली.
मणिपूर येथून निघालेली भारत जोडो न्याय यात्रा लवकरच गुजरातमध्ये प्रवेश करणार असून गुजरातमधून ही यात्रा महाराष्ट्रात मंगळवार, १२ मार्च रोजी दाखल होणार आहे. यात्रेचे राज्यात जोरदार स्वागत करण्यासाठी काँग्रेसतर्फे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
गेल्या महिनाभरापासून जिल्हा काँग्रेसतर्फे नियोजनावर भर दिला जात आहे. त्याच अनुषंगाने सोमवारी आमदार बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारात भेट देत नियोजनाचा आढावा घेतला.
आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाहीर सभा होणाऱ्या जागेची पाहणी केली. मोठ्या संख्येने होणारी गर्दी लक्षात घेता, आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. नंदुरबारात यात्रा दाखल झाल्यानंतर बायपास रोडने रोड शो करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा
नंदुरबार जिल्ह्यात १२ मार्च रोजी दाखल होणार आहे. गुजरात राज्यातूनती जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. नवापूरनजीक राज्याच्या सीमेवर यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येईल. तेथून नवापूर येथे छोटेखानी कार्यक्रम होऊन थेट नंदुरबार येथे यात्रा दाखल होईल. तेथून नंदुरबारातील सी. बी. पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या मैदानावर खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी झालेल्या आढावा बैठकीत माजी मंत्री.आ.ॲड.के.सी.पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक, माजी खासदार बापू चौरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, प्रतिभा शिंदे, दिलीप नाईक, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.