नंदुरबार l प्रतिनिधी
तापी बुराई पाणीपुरवठा योजनेला सुधारित मंजुरी मिळालेली आहे. योजना लवकरात लवकर पूर्णत्वात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना बैठक घेण्याचे साकडे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी घातलेले आहे.
शिंदगव्हाण ता.नंदुरबार येथे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आले. यावेळी ते म्हणाले,तापी बुराई पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ठाणेपाड्यात पाणीपुरवठा करण्यात येणार होता. परंतु,आता ते रद्द करण्यात आले आहे. नंदुरबार तालुक्यातील निंभेल,आसाणे, शनिमांडळ नंतर बुराईकडे पाणी वळविण्यात येणार आहे.१०० कोटींची योजना ८०० कोटी रुपयात गेली. योजनेला प्रारंभ करून एक फेज तरी चालू करायला पाहिजे. त्यामुळे नंदुरबार तालुक्यातील असंख्य गावांमधील पाण्याचे प्रश्न सुटेल.
प्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, बाजार समितीचे संचालक मनोहर पाटील, दिनेश पाटील, सरपंच निर्मला पाटील, उपसरपंच प्रदीप बोरसे,सदस्य मंगला पाटील,विनोद पाटील, नीता पाटील,वैशाली भिल, विद्या पाटील, अमरसिंग भील,मंगला विनायक पाटील,पं. स माजी सदस्य पंडितराव पाटील,बापू विश्राम पाटील, शेतकी संघाचे माजी चेअरमन विश्वासराव पाटील,माजी सरपंच संजय पाटील, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुभाष पाटील, माजी सरपंच काशिनाथ पाटील,माजी उपसरपंच वसंत बोरसे, तीसीचे माजी सरपंच दिनेश पाटील,काकरद्याचे माजी सरपंच रवींद्र पाटील, चिंतामणी एज्युकेशन सोसायटीचे सचिव युवराज पाटील, विकासो चेअरमन दिनेश पाटील, गणेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बन्सीलाल पाटील, पोलीस पाटील विश्वास बोरसे आदी उपस्थित होते.
या कामांचे भूमिपूजन
मग्रारोहयोअंतर्गत गावात विविध ठिकाणी २० लाखांचे पेव्हर ब्लॉक बसविणे,५ किलोमीटर अंतराचे १ कोटी २४ लाखांचे मातोश्री शेत पानंद रस्ते बनविणे व १० लाखांच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाची भूमिपूजन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
सरपंचताईंची अशीही समाजसेवा
नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदगव्हाण गावातील ग्रामस्थ वर्षानुवर्षे पाणीटंचाईला तोंड देत आहेत. पाणीटंचाईच्या सामना म्हणजे गावकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला. आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या हेतूने गावाच्या सरपंच निर्मला पाटील यांनी स्व. कन्हैया फकीरा पाटील यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने विहीर बांधून दिली. या विहिरीचे जलपूजन माजी आमदार रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.