नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूर तालुक्यात खासदार डॉक्टर हिना गावित यांनी झंझावाती दौरे करून भाटपुरा जिल्हा परिषद गटातील बारा गावांमध्ये सुमारे 30 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ केल्याच्या पाठोपाठ हिसाळे जिल्हा परिषद गटातील 11 गावांमध्ये दहा कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ, भूमिपूजन तसेच लोकार्पण केले.
दरम्यान शिरपूर शहरासह प्रत्येक गावात दणकेबाज स्वागत करून प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी खासदार डॉक्टर हिना गावित यांचा उत्स्फूर्तपणे सत्कार केला. काही गावांमध्ये मोठ्या जल्लोषात मिरवणुका देखील काढण्यात आल्या त्यामुळे निवडणूक लागण्याआधीच आणि पक्षाने घोषित करण्याआधीच खासदार डॉक्टर हिना गावित यांची गावागावांमध्ये वातावरण निर्मिती झालेली पाहायला मिळाली.
खासदार डॉक्टर हिना गावित यांचे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील खेड्यापाड्यांना भेटी देण्यासाठी झंजावातीत दौरे दोन महिन्यापासून सुरूच असून ज्यांना कधी दहा लाख रुपयांचा निधी सुद्धा कुठल्या लोकप्रतिनिधीकडून मिळालेला नाही अशा लहान लहान गावांना कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन विविध विकास कामांचा शुभारंभ करणे चालूच आहे. या अंतर्गतच शिरपूर तालुक्यातील हिसाळे जिल्हा परिषद गटात केलेल्या विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. रस्त्याचे काँक्रिटीकरण ठक्कर बाप्पा योजनेतून जलशुद्धीकरण यंत्र बसविणे ब्लॉक बसवणे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जल कुंभ उभारणे हरघर नल योजनेतून घराघरापर्यंत पाईपलाईन टाकणे, अशा विविध विकासकामांचा यात समावेश आहे. अति दुर्गम भागातील दुर्लक्षित म्हटले जाणारे महादेव दोंदवाडे गावात 3 कोटी 16 लक्ष 85 हजार, हिसाळे गावात 1 कोटी 96 लक्ष 36 हजार, तोंदे 45 लक्ष, पिंपरी 26 लक्ष यासह बाबळाज, सावळदे, अजनाड आदी गावांचा समावेश होता.
याप्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे, धुळे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य बेबीताई पावरा, नंदुरबार येथील भाजपाचे माजी उपाध्यक्ष रवींद्र गिरासे, पंचायत समिती सदस्य मनोज गायकवाड आणि गावातील सरपंच उपसरपंच व मान्यवर उपस्थित होते.