नंदुरबार l प्रतिनिधी-
विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण ग्रामीण भाग पिंजून काढणारे झंजावाती दौरे करणे भारतीय जनता पार्टीच्या खा. डॉ.हिना गावित यांनी सुरूच ठेवलेले आहे. या दरम्यान प्रत्येक गावात होणारे त्यांचे स्वागत, काढल्या जाणाऱ्या मिरवणुका आणि विविध जाती समाज संघटनांकडून केले जाणारे सत्कार सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
शिरपूर तालुक्यातील भाटपुरा जिल्हा परिषद गट आणि हिसाळे जिल्हा परिषद गटातील 20 हून अधिक गावांमध्ये जवळपास 40 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण खा. डॉ.हिना गावित यांच्या हस्ते पार पडले त्यानिमित्त केलेल्या दौऱ्याप्रसंगी शिरपूर शहरात जैन समाजाच्या वतीने करण्यात आलेला त्यांचा सत्कार सोहळा अभूतपूर्व ठरला. शिरपूर शहरातील सव्वाशे वर्ष पूर्वीचे भगवान व्यंकटेश मंदिर ट्रस्टच्या वतीने देखील त्यांचा प्रारंभी सत्कार करण्यात आला.
शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत प्रारंभी मंदिर परिसरातून वाजत गाजत मंदिरापर्यंत आल्यानंतर खा. डॉ.हिना गावित यांच्या हस्ते जैन समाजातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जैन समाज भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. खा. डॉ.हिना गावित यांनी जैन समाजाच्या या भावनासाठी दोन कोटी रुपयांचा भरीव निधी मिळवून दिल्याबद्दल समस्त जैन बांधवांनी त्यांच्या कार्याचा गौरव करीत आभार मानले. भगवान व्यंकटेश बालाजी यांच्या मूर्तीचे विधिवत पूजन खा. डॉ.हिना गावित यांच्या हस्ते पार पडले त्यानंतर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणुकीने चालत जाऊन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी त्याच भागातील अन्य मंदिरांमध्ये जाऊन पूजन करून श्रद्धा व्यक्त केली. त्यानंतर पार पडलेल्या जाहीर सभेत देखील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला.
याचंप्रमाणे अन्य अनेक गावांमध्ये फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करून ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथकांच्या समवेत खासदार खा. डॉ.हिना गावित यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. आमच्या गावांना भेटी देणारे एकमेव खासदार असे म्हणून जागोजागी ग्रामस्थ मंडळी जल्लोष करताना दिसली.
धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठापर्यंतचा अतिदुर्गम भाग असो की जिथे कोणतेही लोकप्रतिनिधी अथवा यंत्रणा पोहोचलेली नाही अशा तोरणमाळ परिसरातील झापी तलाई उडद्या भादल किंवा शिरपूर तालुक्यातील महादेव दौंडवाडे यासारखे गावपाडे असो त्या दुर्गम गावांना भेटी देणे त्यांनी गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने चालू ठेवले आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील आठही तालुक्यात म्हणजे शिरपूर साक्री तळोदा शहादा नवापूर धडगाव अक्कलकुवा नंदुरबार या सर्व ठिकाणी विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि शुभारंभ निमित्त त्यांचे पाठोपाठ दौरे चालू आहेत. भारतीय जनता पार्टीच्या खा. डॉ.हिना गावित यांनी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या सहकार्याने त्या सर्व ठिकाणी कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांची पूर्तता केली आहे. यामुळे शब्दाला जागणारा खासदार अशी त्यांच्याविषयीची प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे.