नंदुरबार l प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत, अर्पण संस्था, मुंबई आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (डायट) नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने, आदर्श शाळा योजनेतील शाळांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक, तसेच केंद्र प्रमुख यांच्यासाठी ‘बाल लैंगिक शोषणास’ प्रतिबंध करणाऱ्या वैयक्तिक सुरक्षा प्रशिक्षणा दि. २७ आणि २८ फेब्रुवारी २०२४ या संपन्न झाले.
मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी व कार्यरत असलेल्या शाळांमध्ये वैयक्तिक सुरक्षा शिक्षण लागू करण्यासाठी या प्रशिक्षणाची मदत होईल. तसेच पालक व प्रौढ भागीदार या विषयावरमार्गदर्शन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत अर्पण ही संस्था, मुंबईसह जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त, भारतातील बाल लैंगिक शोषणाच्या निर्मूलनासाठी काम करणारी, पुरस्कारप्राप्त अशासकीय संस्था (एन.जी.ओ) आहे. अर्पण ही भारतातील सर्वात मोठी अशासकीय संस्था आहे जी लहान मुलांसहित प्रौढांसाठी सुद्धा बाल लैंगिक शोषण प्रतिबंध आणि हस्तक्षेप प्रशिक्षण सेवा देते.
प्रशिक्षणात बाल लैंगिक शोषण या विषयाची ओळख मूल आणि मुलांचे अधिकार, बाल शोषण आणि बाल लैंगिक शोषणाचे प्रकार, आकडेवारी, बाल लैंगिक शोषणाचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रभाव, पॉक्सो कायदा आणि तरतुदी या बाबत सविस्तर चर्चा व मार्गदर्शन या प्रशिक्षणात करण्यात आले. यावेळी 121 शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती उपस्थित होते. डायटचे प्राचार्य प्रविण चव्हाण, जिल्हा समन्वयक आणि विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र महाजन, अर्पण संस्था, मुंबईचे विषय तज्ज्ञ राज मौर्य यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डायटचे अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार, डॉ. बाबासाहेब बडे, विनोद लवांडे, सुभाष वसावे, प्रदीप पाटील, विषय सहायक देवेंद्र बोरसे यांनी सहकार्य केले.