नंदुरबार l प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले प्रखर हिंदुत्व विचारांचे शिक्षक अर्थात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात शुक्रवार दि. 23 फेब्रुवारी रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांने निधन झाले. तत्कालीन धुळे जिल्ह्याच्या विभाजनानंतर स्वतंत्र नंदुरबार जिल्हा निर्मिती प्रक्रियेत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून स्व. मनोहर जोशी नंदुरबारकरांच्या कायम स्मरणात राहतील.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्र राज्यातील शिवसेनेचा खरा कोहिनूर हिरा हरपला. बहुआयामी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वसनीय आणि निकटवर्तीय होते. तत्कालीन शिवसेना-भाजप युती शासन काळात सन 1995 ते 99 पर्यंत मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री ठरले. नंदुरबार जिल्हा निर्मितीची घोषणा दि.1 जुलै 1998 रोजी करण्यात आली होती. तदनंतर दि. 13 जुलै 1998 रोजी नंदुरबार जिल्हा निर्मिती सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंढे नंदनगरीत आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य सोहळा झाला.
सर्वप्रथम तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नंदुरबारच्या माणिक चौकातील हुतात्मा स्मारकास भेट देऊन बाल शहिदांना अभिवादन केले होते. याप्रसंगी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गोपीनाथ मुंढे या दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. महादू हिरणवाळे यांच्याकडून नंदुरबारच्या बाल शहिदांविषयी जोशी आणि मुंढे यांनी माहिती जाणून घेतली.
तब्बल 26 वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्हा निर्मितीनिमित्त नंदुरबार शहरात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची दुर्मिळ भेट आजही हृदयात कायम आहे. सन 1997 ला युती शासनाच्या काळात शिवशाही आपल्यादारी हा लोकप्रिय कार्यक्रम मुंबई दूरदर्शन वरून प्रसारित होत असे. याच कार्यक्रमात तत्कालीन धुळे जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील पत्रकार म्हणून महादू हिरणवाळे यांचा सक्रिय सहभाग होता.
या कार्यक्रमात महादू हिरणवाळे यांनी राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळचा विकास महाबळेश्वर प्रमाणे व्हावा असा प्रश्न उपस्थित केला होता. याच कार्यक्रमात तत्कालीन पर्यटन मंत्री ठाण्याचे आमदार जगन्नाथ पाटील उपस्थित होते. तर सन 1999 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण प्रश्न गाजत असताना खुद्द मुख्यमंत्री मनोहर जोशी हेलिकॉप्टरद्वारे थेट मुंबईहून सातपुड्यात दाखल झाले होते. या आठवणी आजही आदिवासी बहुल भागातील नंदुरबारकरांच्या स्मरणात आहेत.