नंदुरबार l प्रतिनिधी-
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील जिल्ह्याच्या दुर्गम भागात दळणवळणाची साधन अद्याप पर्यंत उपलब्ध झालेली नाहीत. शिक्षण,आरोग्य व भौतिक संसाधनांची वानवा असलेल्या जिल्ह्याच्या दुर्गम भागातील बालकांना हेलिकॉप्टरची सवारी म्हणजे दिव्य स्वप्नच होय.
त्याचे झालं असे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र शिवसेनेचे नेते तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे गुरुवारी धडगाव येथे मेळाव्यानिमित्त आले होते. सकाळी १०.४५ वाजता त्यांचे हेलीपॅडवर आगमन झाले. यावेळी त्यांच्या सोबत उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खणीकर्म व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादाजी भुसे देखील उपस्थित होते.त्यानंतर त्यांनी मेळाव्याला संबोधन केले. मेळावा आटोपल्यानंतर ते पुन्हा पुढील कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने रवाना होत असतांना आदिवासी लहानग्या बालकांकडे त्यांचे लक्ष गेले.
खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंत्री उदय सामंत, दादाजी भुसे यांना हेलिपॅडवर थांबवित आदिवासी लहानग्या बालकांना हेलिकॉप्टरमधून सफर घडवण्याच्या चंग बांधला. त्यांनी सुरक्षा रक्षकांना लहान बालकांना हेलिकॉप्टरमध्ये बसवण्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्या बालकांना हवाई सफर घडवली. यावेळी मुलांना आपण झोपेत आहोत की काय असं वाटायला लागलं.
नंदुरबार जिल्ह्यात अनेक राजकीय मोठमोठी नेते मंडळी हेलिकॉप्टरने येऊन गेलीत. परंतु, मुख्यमंत्री पुत्र खा.डॉ श्रीकांत शिंदे यांनी आदिवासी मुलांप्रती असलेली संवेदना जिल्हावासियांच्या कायम लक्षात राहील.