नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शहादा तालुक्यात खेडदिगर येथे पंतप्रधान उज्वला गॅस योजनेतून तब्बल अडीच हजार महिला लाभार्थींना गॅस शेगडी आणि गॅस कनेक्शन खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले. एकाच कार्यक्रमात इतक्या गॅस शेगड्या वाटप करण्याचा हा विक्रम असून याआधी शिरपूर तालुक्यात सुमारे पाच हजार गॅस शेगडी वाटपाचा विक्रम खा. डॉ. हिना गावित गावित यांनी नोंदवला आहे.
पंतप्रधान उज्वला गॅस योजनेची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करणाऱ्या एकमेव खासदार म्हणून खा. डॉ. हिना गावित यांचे नाव मोदी सरकार मध्ये अग्रक्रमाने घेतले जाते. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 2023 पर्यंत सुमारे दीड लाख महिलांना त्यांनी गॅस शेगडी वाटप केलेले आहे.
चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या दुर्बल घटकातील महिलांना या माध्यमातून मोठा आधार मिळाला असून अद्यापही त्यांनी लोकसभा मतदारसंघात या योजनेचा लाभ देणे सुरू ठेवले आहे. शहादा तालुक्यातील खैडदिगर येथे काल झालेल्या या विक्रमी वाटप प्रसंगी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती हेमलता शितोळे, शशिकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य वंदना पटले, गोविंद पटले, रायखेडचे सरपंच कैलास पाटील, गोगापूरचे ऋषिकेश पाटील, चतुर माळी, पुष्पा माळी, मेघराज बर्डे यांच्यासह स्थानिक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी विकास मंत्री असताना 2009 ते 2014 या वर्षात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्रात गॅस वाटपाची योजना रबवली होती. चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांची आरोग्य आणि आर्थिक समस्येतून सुटका करावी या हेतूने पहिल्यांदा खासदार बनल्यानंतर तीच योजना केंद्र सरकारकडून अमलात आणण्याची आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गळ घातली होती. त्यातूनच पंतप्रधान उज्वला गॅस योजना अमलात आणली गेली आहे; असे खा. डॉ. हिना गावित यांनी याप्रसंगी भाषणातून सांगितले.