म्हसावद l प्रतिनिधी-
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वराहांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली होती. भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यानंतर प्राप्त झालेल्या अहवालानुसार मृत वराहांमध्ये अफ्रिकन स्वाईन फिवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे म्हसावद येथील १ कि.मी. परिघातील भागास बाधित क्षेत्र घोषीत करण्यात आले असून पशूसंवर्धन विभागाच्यावतीने कलिंग प्रक्रीयेला सुरुवात करण्यात आली आहे तर तर १० कि.मी.परिघरातील क्षेत्राला संनियत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी शेकडो वराहांचा मृत्यू झाला होता. यानंतर एकच खळबळ माजली होती.नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली होती. त्यानंतर पशूसंवर्धन विभागाने मृत वराहांचे नमुने घेवून भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.
त्यानंतर दि.१४ रोजी प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालानुसार वराहांचा मृत्यू अफ्रिकन स्वाईन फिवरने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात अफ्रिकन स्वाईन फिवर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने व रोग जलद गतीने पसरण्याचा दिसून आले आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राण्यांमधील संसर्ग व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमाप्रमाणे शहादा तालुक्यातील म्हसावद येथील १ कि.मी. परिघरातील भागास बाधित क्षेत्र घोषीत केले तर १० कि.मी. परिघातील क्षेत्र संनियंत्रण क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. बाधित क्षेत्र परिसरातील सुमारे चार वराहांचे काल किलिंग करण्यात आले आहे.
बाधित क्षेत्राच्या १ कि.मी.परिसरातील सर्व वराहांचे कलिंग करुन त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावून त्या परिसराचे निर्जंतूकीकरण करावे. अफ्रिकन स्वाईन फिवर या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरात सक्रीय संनिरीक्षण व्यापक प्रमाणावर करावे व सुयोग्य जैव सुरक्षा उपाययोजना कराव्यात. पाळीव तसेच जंगली वराहातील अनियमित मरतूकीवर बारकाईने लक्ष ठेवावे. वराहांच्या मांसाची विक्री करणाऱ्याआस्थापनाची नोंदी करण्याची प्रक्रिया करुन त्या आस्थापनांना स्थानिक पशु वैद्यकांनी नियमित भेटी देऊन नियंत्रण ठेवावे. तसेच मोकाट पद्धतीने होणारे वराह पालन टाळण्यात यावे. घरगुती तसेच हॉटेलमध्ये वाया गेलेले किंवा शिल्लक राहिलेले अन्न वराहांना देणे ही विषाणूच्या प्रसारीत मुख्य करुन कारणीभूत असल्याने अशा प्रकारचे खाद्य देणे टाळणे गरजेचे आहे.
याशिवाय निरोगी वराहांचा घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस, उपपदार्थ तसेच कचरा यांच्याशी संपर्क येऊ देऊ नये. वराह पालन केंद्रातील तसेच वराह मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवू नये. वराह पालन करणारे पशुपालक व व्यवसायासंबंधी व्यक्ती यांच्या या रोगाविषयी जागृकता निर्माण करुन रोगाच्या प्रादूर्भावाविषषयी सुचना द्यावी. पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पोलिस व चेक नाके यांच्याशी समन्वय ठेवून शेजारी राज्यातील वराहांची अनाधिकृत प्रवेश होणार नाही याची दक्षता घ्यावी.








