नंदुरबार l प्रतिनिधी
नवी दिल्ली स्थित राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे प्रतिनिधी मंडळ नंदुरबार जिल्ह्यातील उडद्या व खापरमाळ ता. धडगाव येथे 9 फेब्रुवारी, 2024 रोजी दौऱ्यावर असून बालहक्क उल्लघंनाच्या तक्रारींवर 10 फेब्रूवारीला सुनावणी होणार असल्याचे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या दौऱ्यात बालकांना पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा व इतर सोयी सुविधांबाबत आढावा घेण्यात येणार असून बालकांच्या हक्कांच्या उल्लघंनाच्या संदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने 10 फेब्रुवारी, 2024 रोजी बिरसामुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे सकाळी 10 वाजेपासुन जनसुनावणी घेण्यात येणार आहे.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांच्यामार्फत नंदुरबार येथे होणाऱ्या जनसुनावणीसाठी बालकांच्या हक्कांच्या उल्लंघनासंदर्भात काही तक्रारी असल्यास त्या-त्या विभागप्रमुखाकडे अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत दुसरा मजला कक्ष क्र. 226 टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे 9 फेब्रवारी, 2024 पूर्वी लेखी स्वरुपात सादर करुन जनसुनावणीच्या ठिकाणी लेखी अर्जासह उपस्थित रहावे. तसेच बालकांच्या हक्काच्या उल्लंघनासंदर्भात तक्रारी असल्यास बालक, पालक, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ता यांच्यामार्फतही 10 फेब्रुवारी, 2024 रोजी होणाऱ्या सुनावणीच्या ठिकाणी देखील तक्रारी स्विकारण्यात येतील.
बालकांच्या हक्कांच्या उल्लंघनासंदर्भात तक्रारी असल्यास, तक्रारदार बालक, पालक, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ता यांनी जास्तीत जास्त तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहनही श्री. बिरारी, यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.