शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ महात्मा गांधी सभागृहात संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
प्रमुख अतिथी म्हणून ‘अनुगामी लोकराज्य महाअभियान’ अनुलोमचे महाराष्ट्र राज्य प्रमुख स्वानंद ओक हे उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डीवायएसपी दत्ता पवार, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, मंडळाचे संचालक प्रा. आर. एफ. पाटील, मंदाणेचे माजी उपसरपंच अनिल भामरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, प्राचार्य बी. के. सोनी, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार,प्राचार्य डॉ. एन.जे. पटेल, प्राचार्य गीता महाडिक, प्राचार्य रविंद्र एस. पाटील, प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल, उपप्राचार्य डॉ. एम. के. पटेल, उपप्राचार्य डॉ. सिंदखेडकर, उपप्राचार्य कल्पना पटेल आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
प्रमुख अतिथी स्वानंद ओक आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, लहानपणी केलेल्या कष्टातूनच युवक घडत असतो. भारत हा तरुणांचा देश आहे. विद्याध्यर्थ्यांना लवकरच मतदानाचा अधिकार मिळेल. अधिकाराबरोबरच कर्तव्य देखील महत्त्वाचे असतात. अधिकार मिळवावा लागतो. विद्यार्थ्यांनी दररोज एक मराठी आणि एक इंग्रजी वृत्तपत्र वाचायला हवे. जपान देशातील नागरिकांचे उदाहरण देऊन श्री.ओक पुढे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत शिस्तीत वागल्यास ती सवय आयुष्यभर लागते. त्याचा
फायदा आपल्यासह देशातील नागरिकांना होतो. आताच्या काळात असे दिसते की युवा वर्ग मोबाईल,टीव्ही, कॉम्प्युटर, सिनेमा यांच्या स्क्रीनसमोर जास्तीत जास्त वेळ असतो. आताची पिढी ‘स्क्रीन्स्टर्स’बनत आहे. जितके विद्यार्थी स्क्रीनसाठी कमीतकमी वेळ द्याल, स्क्रीनपासून दूर रहाल आणि तो वेळ चांगल्या कामासाठी, मैदानी खेळांसाठी द्याल तर युवकांची प्रगती बेगाने होईल.

संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, विद्याध्यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमात सहभाग द्यायला हवा, अभ्यास, कठोर परिश्रम व स्पर्धेचा सामना करून विद्याथ्यांनी यशाच्या मार्गाकडे जावे, मोठे व्हावे, चांगले घडावे. समाजात ज्याही वाईट गोष्टी असतील त्यापासून दूर राहून आपले चांगले भवितव्य घडवावे. प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेची माहिती दिली. त्याचबरोबर वर्षभरात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाची माहिती दिली. महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांबद्दल माहिती दिली. त्यासह शासनाच्या विविध योजनांद्वारे महाविद्यालयाला मिळालेल्या अनुदानांची माहिती दिली.वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना यांच्याकडून विविध शिबिरांत सहभागी विद्यार्थी, विविध आंतरमहाविद्यालयीन, आंतरविभागीय, आंतरविद्यापीठ, राज्यस्तरीय व विविध मैदानी स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयातील विविध स्पर्धेत सहभागी विद्यार्थी तसेच बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. खुमानसिंग वळवी, डॉ. गजानन पाटील व डॉ. रविंद्र माळी यांचा पीएच. डी. पदवीप्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. व्ही. ओ. शर्मा व शिक्षकेतर कर्मचारी दिनेश शिंदे यांच्या पुरस्कार प्राप्तीबद्दल गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. वाय. के. शिरसाठ, डॉ. व्ही. ओ. शर्मा यांनी केले. बक्षिस यादी वाचन प्रा. डॉ. आर. व्ही. पाटील, उपप्राचार्य कल्पना पटेल, प्रा. व्ही. सी. डोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील व कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले.








