नंदुरबार l प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू होते. त्या आंदोलनाला शनिवारी यश मिळाले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाला बसलेले उमर्दे खुर्द येथील गुलाब मराठे हे मुंबई येथे आंदोलनात सहभागी झाले होते.ते परतल्या नंतर उमर्दे येथे सकल मराठा समाज व गावकऱ्यांच्या हस्ते भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी माल्यार्पण व पूजन करुन फटाके फोडून, पेढे भरुन जल्लोष करण्यात आला.
आंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने मुंबईकडे कूच करत नवी मुंबई येथे धडक मारली होती. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आंदोलनस्थळी जाऊन मराठा समाजाने मागितलेल्या मागण्या पूर्ण करत असल्याचे जाहीर करत त्यासंदर्भातील शासन निर्णय मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द करत समाजाच्या मागण्या मान्य केल्या.
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथील गुलाब महारू मराठे यांनीही आमरण उपोषण केले.त्यानंतर अनेक दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले होते.आंदोलनासाठी ते मुंबई येथे पायपीट करीत पोहचले दरम्यान शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आंदोलनस्थळी जाऊन मराठा समाजाने मागितलेल्या मागण्या पूर्ण केल्याने ते गावाकडे परतले. यावेळी गावातील सुमारे 50 युवक मुंबई येथे गेले होते.सकल मराठा समाज व गावकऱ्यांच्या हस्ते उमर्दे खुर्द येथे गुलाब महारू मराठे यांची डी.जे.च्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गुलाब महारू मराठे यामा सजवलेल्या ट्रॅक्टर वर बसवून गावातून मिरवणूक काढली.यावेळी गावातील सर्व घरातून गुलाब मराठे यांचे औक्षण करण्यात आली.मिरवणुकीत गावातील महिला, पुरुष, बालके मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी माल्यार्पण व पूजन करुन फटाके फोडून, पेढे भरुन जल्लोष करण्यात आला.









