नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल मध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्य विषयास अनुसरून स्थूलपणा विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
या निमित्ताने व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पाटील हॉस्पिटलचे डॉ.राजकुमार पाटील उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक होते तसेच उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक,पर्यवेक्षक विपुल दिवाण व हेमंत खैरनार उपस्थित होते.
प्रमुख अतिथी डॉ.पाटील यांनी आपल्या वक्तव्यातून स्थूलपणा व डोळ्यावर पडणारा ताण याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की उंची व वजनावर स्थूलपणा कळतो,वयानुसार नाही.प्रत्येक विद्यार्थ्याने नित्य व्यायाम करणे,भरपूर खेळणे आवश्यक आहे यामुळे स्नायू बळकट होतात,मोबाईलच्या अतिवापरामुळे आपला स्क्रीन टाईम वाढून डोळ्यांचे त्रास व मानसिकता बिघडते.
हल्ली मोकळ्या जागेत खेळण्याचे मैदान नसून दुकाने,मॉल,पार्किंग असते,मैदानी खेळ क्रिकेट,फुटबॉल आता बॉक्स मध्ये खेळतात,.आपल्या आहाराच्या सवयी बदलणे,बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नये यासंदर्भात पालक ,शिक्षक व समाजातील व्यक्तींनी उद्बोधन मार्गदर्शन करणे अत्यावश्यक आहे. स्थूलतेमुळे हार्ट अटॅक चे प्रमाण वाढले आहे.आपल्या आरोग्याची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक यांनी आपल्या अमूल्य मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आपली प्रतिकार शक्ती वाढवणे,सकस आहार खाणे,विदेशी सवयी जंक फूड पासून दूर राहणे,सुदृढ आयुष्य जगणे व नियमित योगा व व्यायाम करण्याच्या सूचना व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिनेश वाडेकर यांनी मानले.








