नंदुरबार l प्रतिनिधी-
देशाच्या 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील मुख्य इमारत या परिसरात जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष नाईक, त्यासोबत जिल्हा परिषदेतील सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी सांगितले की,राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्षांना बोलण्याची संधी मिळाली असून मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्यापासून राज्य शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत.
आजचा दिवस आपल्या देशाच्या प्रमुख राष्ट्रीय सण आहे. प्रजासत्ताक दिन हा देशाच्या स्वातंत्र्य तसेच अखंडतेचे प्रतिक आहे. सन १९५० साली आपल्या देशात संविधान लागु झाले आणि आपण लोकशाही स्विकार केली. लोकशाही मध्ये लोकप्रतिनिधी आणि शासन यांच्या समन्वयाने देशाचे कामकाज चालते. भारत जगातील लोकशाही प्रधान असलेला सर्वात मोठा देश आहे. ज्या जिल्हा परिषदेत आपण सर्व एकसंघ परिवार म्हणून काम करतो. ती जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय आहे. या मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून आपण नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक खेड्या पाड्यात व दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या समाजाची सेवा करीत असतो. राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना पहिल्यांदा ध्वजारोहण केल्यानंतर बोलण्याची संधी मिळाली असून, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी कामकाज स्विकारल्यापासुन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित तसेच जिल्ह्याच्या संसदरत्न खासदार डॉ. हिना गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात अनेकानेक योजना राबवून व त्यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून तसेच राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न करुन विविध प्रकारचा निधी प्राप्त करुन समस्त जिल्हावासीयांना योजनेचा लाभ दिलेला आहे. जिल्ह्यातील ३६ शाळांना आपण डिजीटल केले असून त्यासाठी रुपये एक कोटी चोवीस लक्ष निधी खर्च केलेला आहे.
दोनशे बहात्तर शाळांमध्ये साडेतीन कोटी रुपये निधी खर्च करुन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन यंत्र बसविले आहे. एकशे पंच्चावन्न शाळांमध्ये सहा कोटी रुपये निधी खर्च करुन जलशुध्दीकरण यंत्र बसविले आहेत. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नऊशे चार बेंचस उपलब्ध करुन देण्यासाठी सत्तर लक्ष रुपये निधी खर्च केलेला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व एक हजार तीनशे त्र्यान्नव शाळांना पंचावन्न लक्ष रुपये निधी खर्च करुन First Aid Kit उपलब्ध करुन दिले आहे. तीन हजार आठशे तेरा विद्यार्थ्यांना दोन कोटी रुपये निधी खर्च करुन सायकल वाटप केलेले आहे. बासष्ट कोटी रपये निधी खर्च करुन २० आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे बांधकामे केलेले आहेत. चार कोटी सत्तावीस लक्ष रुपये निधी खर्च करुन अठरा आरोग्य केंद्रांना Oral Cancer Screening Tool आणि Breast Cancer Screening Tool वैद्यकीय चाचणीसाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत. सोळा कोटी अडूसष्ट लक्ष पंचेचाळीस हजार रुपये निधी खर्च करुन अंगणवाडी केंद्राची बांधकामे मंजुर केलेली आहेत. तीन कोटी त्रेसष्ट लक्ष आठ हजार रुपये निधी खर्च करुन स्मार्ट अंगणवाडी तयार करण्यात आलेली आहेत. बारा कोटी बहात्तर लक्ष एकोणतीस हजार निधी विहीर पॅकेजसाठी मंजुर करण्यात आलेला आहे.
जनसुविधा योजने अंतर्गत ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी रुपये दोन कोटी नव्वद लक्ष निधी मंजुर करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियान अंतर्गत चार कोटी तीस लक्ष निधी मंजुर करण्यात आलेले आहे. रुपये बारा कोटी एकसष्ट लक्ष एकात्तर हजार निधी संसद संकुल परियोजनेसाठी मंजुर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद सेस निधीतुन ग्रामपंचायतींना शुध्द पाण्याच्या पुरवठा होण्यासाठी एकुन तीन कोटी रुपये निधी खर्च करुन वॉटर फिल्टर बसविणेत येत आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत आठशे अठ्यान्नव कोटी निधी मंजुर करुन पाणी पुरवठा योजना राबविणेत येत आहेत. रुपये सहासष्ट कोटी निधी घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनासाठी मंजुर करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एकुण एक लाख अठरा हजार तीनशे त्रयान्नव घरकुले मंजुर असून त्यापैकी चोवीस हजार तीनशे नऊ घरकुले पुर्ण करण्यात आलेली आहेत. शबरी आवास योजने अंतर्गत तेवीस हजार एकोणपन्नास घरकुले मंजुर असून सहा हजार पाचशे वीस घरकुले पुर्ण करण्यात आले आहेत. रमाई आवास योजने अंतर्गत दोन हजार आठशे शहात्तर घरकुले मंजुर असून रमाई आवास योजने अंतर्गत शंभर टक्के घरकुले पुर्ण करण्यात आले आहेत. वरील सर्व योजनांची अंमल बजावणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने शक्य झाली असून यापुढे देखील आपण एकसंघ परिवार म्हणून काम करणार असून जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्व कटीबध्द राहू असे जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी सांगितले.








