नंदुरबार l प्रतिनिधी
अयोध्येतील राम जन्मभूमीवर बांधलेल्या भव्य मंदिरात प्रभू श्रीराम ची मूर्ती स्थापन करण्याचे शेकडो वर्षांचे स्वप्न पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आनंदाने जल्लोष करीत सकल हिंदू समाज आणि अयोध्या राम मंदिर निर्माण उत्सव समितीने 22 जानेवारी 2024 रोजी दुपारनंतर काढलेल्या भव्य पदयात्रेत न भूतो न भविष्यती असा उत्साह रस्त्यावर ओसंडतांना दिसला.
या दरम्यान खा. डॉ. हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या समवेत हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांनी ‘जय श्रीराम जय श्रीराम’ यासह विविध घोषणा देत आणि ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे’ असा नाम जप करीत शहराचे प्रमुख रस्ते दणाणून सोडले.
अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराची उभारणी आणि राम जन्मभूमीच्या जागेवर श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येत असतानाच संपूर्ण नंदनगरी आनंदात न्हावून निघाली. प्रत्येक घरातील स्त्री पुरुष मुलं मुली दिवाळी मनवताना दिसले. याच पार्श्वभूमीवर श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व हिंदूप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन सकल हिंदू समाज आणि अयोध्या राम मंदिर निर्माण उत्सव समितीने ही पदयात्रा आयोजित केली होती. या पदयात्रेचा शुभारंभ नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिर येथून करण्यात आली.
खासदार आणि झेडपी अध्यक्ष यांचाही जल्लोष
या पदयात्रेत हजारोच्या संख्येने महिलांनी घेतलेला सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. खासदार डॉ. हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित या अग्रभागी ध्वज नाचवून पदयात्रेतील तरुण-तरुणींचा जल्लोष वाढवताना दिसले. भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी प्रमुख सविता जयस्वाल, ॲड.जयश्री गावित आणि अन्य त्यांच्या समवेत सहभागी होते. डीजेवर वाजणाऱ्या गाण्यांच्या तालावर मिरवणुकीतील महिलांनी ठेका धरणे, टाळ्या वाजवत जल्लोषात घोषणा देणे यामुळे अद्भुत चैतन्य निर्माण झालेले दिसले.
कारसेवकांचा सत्कार
यात प्रारंभी प्रभू श्रीरामांचे मनोभावे पूजन करून सामुहिक प्रार्थना करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे डॉ. विक्रांत मोरे, राजा पाटील, गोरक्षक केतन रघुवंशी, माजी नगरसेवक आनंद माळी, लक्ष्मण माळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गिरीश बडगुजर, विजय कासार, डॉ.नितीन पंचभाई, सनातन संस्थेचे प्राध्यापक सतीश बागुल, हिंदू सेवा समितीचे डॉ. नरेंद्र पाटील जितेंद्र राजपूत आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडो राम भक्त उपस्थित होते. यानंतर हिंदू जनजागृती समितीचे रविंद्र पवार, देवा कासार, केतन रघुवंशी, संतोष वसईकर, नरेंद पाटील आदींच्या हस्ते 1992 यावर्षी बाबरी मशीद विरोधातील आंदोलनात सहभाग घेऊन तसेच राम मंदिरासाठी केलेल्या कार सेवेत सहभागी होऊन ज्यांनी योगदान दिले त्या धर्मप्रेमींचा सत्कार करण्यात आला. पदयात्रेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते देखील सहभागी झाले आणि जोरदार घोषणा देत तरुणांना प्रोत्साहित केले.
काढण्यात आलेल्या पद यात्रेत सर्वधर्मिय, सर्वपक्षीय, सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील सर्व महिला आणि पुरुष कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. हातात भगवे ध्वज, डोक्यावर केशरी टोप्या आणि केशरी रंगाची वेशभूषा हे रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे वैशिष्ट्य दिसले. मोठा मारुती मंदिर, शिवाजी चौक, जळका बाजार, सोनार खुंट, हात दरवाजा गांधी पुतळापुतळा, नगरपालिका मार्गे अंधारे चौक येथून पुन्हा मोठा मारुती मंदिर येथे येऊन सांगता करण्यात आली. रॅलीत पाच हजारांपेक्षा अधिक युवक युवती महिला पुरुष सहभागी झाल्याने चैतन्य निर्माण झाले होते. ध्वज घेऊन नाचणाऱ्या मुला मुलींनी व लहान बालकांनी लक्ष वेधून घेतले.