नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार नगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात मोकाट गुरांनी हैदोस घातला आहे.या गुरांमुळे अनेक छोटे मोठे अपघात कायमच होतात.अशीच घटना शहरातील गिरिविहार गेटजवळ घडली. सोमवारी मोकाट गुराने पानसेमल येथील अनिल अग्रवाल या व्यापाऱ्याला उचलून जमिनीवर आपटल्याने त्याचा मृत्यू झाला . या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .पालिकेने यावर ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत होत आहेत.
नंदुरबारात मोकाट गुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
पालिका तेवढ्यापुरता कारवाई करते ; परंतु गुरांची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच चालल्याचे चित्र आहे . काही गुरे आडदांड स्वरूपाची झाली असल्याने त्यांना आवरणे कठीण जाते . त्यामुळे एखाद्यावेळी थेट वाहनावर चाल करून जिवावर उठत असल्याचे चित्र आहे . नागरिकांनी निवेदन दिल्यानंतर पालिका तेवढ्यापुरता कारवाई करते. व परत जैसे थेे परस्थिती राहते. या मोकाट गुरांमुळे अनेक जण जायबंदी झाले आहेत.तर सोमवारी दि. 4 ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास गिरिविहार गेटजवळ दोन मोकाट गुरांची झुंज सुरु होती . यावेळी पानसेमल येथील अनिल अग्रवाल ( ५७ ) हे व्यापारीदेखील त्यांच्या मित्रासह जात असताना झुंजीतील दोन गुरांपैकी एक सुटला . तो सरळ या व्यापाऱ्यावर तुटून पडला . व्यापाऱ्यास शिंगावर घेत हवेत उधळून जमिनीवर आपटल्याने व्यापारी गंभीर जखमी झाला . उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले . यापूर्वी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एक बालिकेचा बळी गेला होता नंदुरबार पालिका आणखी किती जणांचा बळी जाण्याची वाट पहाणार असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत . याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.