नंदुरबार l प्रतिनिधी-
अक्कलकुवा येथे आदिवासी एकता परिषदेच्यावतीने कालिका देवी मंदिराच्या प्रांगणात दि.१३ व १४ जानेवारी रोजी दोन दिवसीय आदिवासी युवा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आ.आमश्या पाडवी यांनी केले आहे.
नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यापुढे आ.पाडवी म्हणाले की, आदिवासींचे जल, जंगल, जमीन, आरोग्य, शिक्षण बोगस जात प्रमाणपत्र घेऊन कार्यरत कर्मचाऱ्यांचा प्रश्न, आदिवासींसाठीचा रोजगार, रितीरिवाज, परंपरा, पोशाख अशा विविध विषयांवर व्यापक चर्चा होण्यासाठी आदिवासी एकता परिषदेच्यावतीने अक्कलकुवा येथील कालिका देवी मंदिराच्या प्रांगणात भव्य आदिवासी युवा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनाप्रसंगी आ.लामटे, आ.नरहरी झिरवाळ, सुनिल गुजारा, छोटू वसावा यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात विचार मांडण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आ.पाडवी यांनी केले आहे. याप्रसंगी शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख के.टी.गावित उपस्थित होते.








