नंदुरबार l प्रतिनिधी
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सीईओ आहे. गावात ग्रामसेवकाने सीईओ च्या भूमिकेत राहून काम केल्यास गावाचा सर्वांगीण विकास होईल. गावात केवळ इमारती व रस्ते न बांधता गावातील आरोग्य, स्वच्छता,कुपोषण,शिक्षण या बाबींकडे विशेष लक्ष देऊन ही कामे गांभीर्याने घ्यावीत. शासनाने दिलेली उद्दिष्टे वेळेवर न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी दिला.
शहादा तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांची समन्वय सभा चावरा इंग्लिश मेडीयम स्कूल येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत गाव स्तरावरील विविध विकास कामांचा आढाव्याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार बोलत होते.
समन्वय सभेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, प्रकल्प संचालक राहुल गावडे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम. डी.धस,उपमुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा राठोड, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव पवार,गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे तसेच तालुकास्तरीय विभाग प्रमुख उपस्थित होते.
सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी पंतप्रधान आवास योजना,शबरी व रमाई आवास योजना, मोदी आवास योजना,स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रगती सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापण अंतर्गत सुरू असलेले कामे, कामे सुरु न झालेल्या गावांचे अंदाजपत्रक तयार करणे,गावे हागणदारी मुक्त अधिक करणे,माझी वसुंधरा अभियान, रोजगार हमी अंतर्गत करावयाची कामे, शिक्षण विभागा अंतर्गत सुरू असलेली कामे,शाळाबाह्य विद्यार्थी,शालेय उपस्थिती याबाबत सविस्तर आढावा घेतला.कुपोषण कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीने खर्च करावयाची दहा टक्के रक्कम याविषयी आढावा घेऊन मार्गदर्शन केले.ग्रामपंचायत अंतर्गत वस्तू खरेदीसाठी जी एम पोर्टल नोंदणी, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी ग्रामपंचायतनिहाय अपूर्ण असलेल्या घरकुल लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष जाऊन संवाद साधावा, अपूर्ण घरकुले पूर्ण करून घ्यावेत अशा सूचनाही सावन कुमार यांनी केल्या.
समन्वय सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,ग्रामसेवक यांनी ग्राम स्तरावर काम करताना सकारात्मकता ठेवून काम करावे, शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत.उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येइल.मात्र कामात टाळाटाळ व कुचराई करणाऱ्या ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्यात येईल. गावस्तरावर काही अडचण असल्यास मला येऊन भेटावे. समस्या सोडवल्या जाती. असेही मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी सांगितले. समन्वय सभेत सर्व उप अभियंता, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता,ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका आदीसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.








