नंदुरबार l प्रतिनिधी
2012 मध्ये किरकोळ कारणावरून नंदुरबार येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजात दुफळी निर्माण झाली होती. यावरून खालचे गाव आणि वरचे गाव असे दोन गट पडले. तब्बल एक तपानंतर अर्थात तेरा वर्षांनी गवळी समाजाच्या दोन गटात मनोमिलन घडून आले.
निमित्त ठरले परमपूज्य बालब्रह्मचारी सिदाजीआप्पा देवर्षी आणि राधाकृष्ण मंदिर महोत्सवाचे. विशेष म्हणजे गवळी समाजात समेट घडवून आणण्यासाठी भाग्यनगर (हैदराबाद) येथील देवर्षी घराण्याचे वंशज चंद्रशेखरआप्पा देवर्षी यांच्या उपस्थितीत पंच मंडळी आणि युवकांनी संघटित होण्याचा निर्णय घेतला. शिवशरणार्थ म्हणजे भोलेनाथ शंकराला शरण जाणे अशी मान्यता आहे.
नंदुरबार शहरात साधारणतः दीडशे उंबरे (घरे )असलेल्या वीरशैव लिंगायत गवळी समाजात 13 वर्षांपूर्वी किरकोळ कारणा वरून तेढ निर्माण झाले होते. त्यानुसार दोन गट पडल्याने लग्न समारंभांसह इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र नववर्षाच्या प्रारंभी दि.1जानेवारी रोजी परम पूज्य बाल ब्रह्मचारी सिदाजीआप्पा देवर्षी आणि राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि भव्य मंदिर जिर्णोध्दारनिमित्त नंद नगरीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच गवळी समजतील महिला आणि युवती यांनी सक्रियपणे सहभाग नोंदविला.या शोभा यात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले होते.यातून समाज संघटन शक्ती दिसून आली.
तीन दिवसीय महोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर रविवारी नंदेश्वर चौकात संयुक्त बैठक घेण्यात आली.या बैठकीस भाग्यनगर (हैदराबाद) येथील चंद्रशेखर आप्पा देवर्षी तसेच नंदुरबार येथील अशोकआप्पा देवर्षी यांच्या प्रमुख उपस्थितीत गवळी समाज बांधवांनी दोन्ही गटातर्फे एकत्रित होण्याचा निर्णय घेतला.
यावेळी चंद्रशेखरआप्पा देवर्षी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,समाज बांधव, पंच मंडळी आणि युवकांनी मागील मतभेद, हेवेदावे। सर्व विसरून नव्या उमेदीने समाज संघटनासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले. मठाचे गादीश्वर देवर्षीआप्पा यांच्या आदेशाचे पालन करीत उपस्थित समाज बांधवांनी एकत्रित होण्याचा एकमुखी ठराव पारित केला.








