नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्याच्या विकास लोक चळवळीच्या व अस्मितेच्या विषय झाला पाहिजे. जिल्हा निर्मितीच्या 25 वर्षांपूर्वीच्या पार्श्वभूमीवर आणि वस्तुस्थितीवर चर्चा होणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे खरे शिल्पकार ही जनताच असून, राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम ‘मुहूर्तमेढ विकसित नंदुरबारची ‘या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी केले. याप्रसंगी जिल्हा निर्मितीचा 25 वर्षानंतर काय साध्य झालं ? यावर मंथन करण्यात आले. असे असले तरी जिल्हा विकासावर चर्चा कमी व डॉ.विजयकुमार गावित यांच्यासह कुटुंबियांवर ताशेरे ओढत मनातील खदखद व्यक्त केली.दरम्यान सर्व पक्षीय नेत्यांचे नाव पत्रिकेत असताना आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या आ. आमश्या पाडवी यांना वगळल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

नंदुरबार शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रविवारी उपक्रमाचे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी रघुवंशी म्हणाले, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम राजकारण विरहित काम करणार आहे. लोकप्रतिनिधी आदिवासी आदिवासींमध्ये शासनाच्या योजना राबवत असताना भेदभाव करीत आहेत.समाजात विषमता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला विरोध आहे. आम्ही आमदार, खासदारांच्या शर्यतीत नाहीत. परंतु, आम्हाला जिल्ह्याच्या खरा विकास करून दाखवायचा आहे. यापुढे जिल्ह्याच्या समतोल विकास साधणारे लोकप्रतिनिधी जनतेने द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचे अभिजीत पाटील यांनी केले. ते म्हणाले, मुंबई येथे 9 फेब्रुवारी रोजी वर्ल्ड स्टेट सेंटर येथे शासनाचे प्रतिनिधी,उद्योजक व नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील पुणे,मुंबई, नाशिक,सुरत येथे स्थायिक झालेल्या नागरिकांची बैठक होईल. केळी,पपई,मिरची व कापूस या सुमारे वार्षिक ३ हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या प्रमुख पिकांची प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसंगी यावेळी माजी मंत्री ॲड.के.सी पाडवी,आ.राजेश पाडवी,आ.शिरीषकुमार नाईक,माजी मंत्री पद्माकर वळवी,माजी आ.कुवरसिंग वळवी,भाजपाचे नागेश पाडवी,भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, जि.प सदस्य विजय पराडके शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयापलासिंह रावल, उद्योजक किरण तडवी,साक्रीचे माजी नगराध्यक्ष नाना नागरे आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे म्हणाले,सर्व राजकीय नेते एका दिलाने एकत्र येऊ शकतात त्यावेळेस जिल्ह्याची विकासाची गंगा कोणी रोखू होऊ शकत नाही. जि.प माजी उपाध्यक्ष जयपाल रावल म्हणाले, जिल्ह्याचा विकास करायचे असेल तर शिक्षण, बेरोजगारी या प्रश्नांची सोडवणूक करायला पाहिजे. जिल्ह्यातून महामार्ग जात असल्याने बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो व सहज कुपोषणाच्या प्रश्न देखील सुटेल. सर्वांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्याची परिस्थिती ‘जैसे थे’च
भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ.राजेंद्रकुमार गावित म्हणाले,नंदुरबारचा इतिहासासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्याचे प्रश्न गंभीर होते आणि आजही परिस्थिती तीच आहे. सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्ह्याची निर्मिती झाली परंतु, आजही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. गाई, मेंढ्या,शेळ्या वाटल्याने विकास होत नाही.आदिवासींना विकास रोखण्याचे काम आज होत आहे.
लोकप्रतिनिधींनी विकासासाठी वेळ द्यावा
माजी मंत्री पद्माकर वळवी म्हणाले, जिल्हा मागासलेला म्हटल्यावर अत्यंत वाईट वाटते.आहे जिल्ह्यातील नागरिक सकारात्मक आहेत हीच सकारात्मक नेत्यांमध्ये निर्मिती झाली तर विकास शक्य आहे. एकमेकांवर टीका टिप्पणी न करता लोकप्रतिनिधींनी विकासासाठी वेळ द्यायला पाहिजे.राजकारणामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.25 वर्षात सर्वांनी एकत्र आलो तोच विकास 10 वर्षात आपण करू शकतो.

राजकीय इच्छाशक्तीचा अभावी प्रश्न प्रलंबित
आ.राजेश पाडवी म्हणाले,आपला जिल्हा सर्व दृष्टीने संपन्न आहे.जिल्हा निर्मितीला 25 वर्ष झाले.परंतु, 25 वर्षानंतर देखील तीच परिस्थिती आहे.राजकीय इच्छाशक्तीचा अभावी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.मोठ्या प्रयत्नाने रस्ते विकासाठी निधी आणला त्यास लोकप्रतिनिधींनी कामात खोडा घातला.

विकास कामात होतोय दुजाभाव
आ.शिरीषकुमार नाईक,जिल्ह्याचा प्रत्येक विभागांकडून विकास कामे केली जात आहेत.त्या कामांमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याने विकास कसा होणार.नर्मदेचे पाणी जिल्ह्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही,आरोग्य,शिक्षण असे अनेक प्रश्न उभे आहेत.नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रेत जाळण्यासाठी 150 गावांना आज अमरधाम नाही. जि.प मधून कामे होत नाही.विकास कामात दूजाभाव होतो.अन्याय,अत्याचार व भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचे काम फोरमने केले पाहिजे.

जिल्हा निर्मितीचे श्रेय घेऊ नये
माजी मंत्री के.सी पाडवी,जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वांना अगोदरच एकत्र यायलाच पाहिजे होते.जिल्हा निर्मितीचे श्रेय कोणीही घेऊ नये.आदिवासी विकास विभागाकडून जिल्ह्याला निधी मिळत असतो. मंत्री असताना आक्षांकित जिल्हा म्हणून आदिवासी विकास विभागाकडून 70 कोटी दिल्याचे त्यांनी सांगितले.
गावित परिवारावरच जास्त प्रहार
नंदुरबार येथे राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम ‘मुहूर्तमेढ विकसित नंदुरबारची ‘या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी केले. याप्रसंगी जिल्हा निर्मितीचा 25 वर्षानंतर काय साध्य झालं? यावर मंथन होणे अपेक्षित असताना यावेळी डॉ.विजयकुमार गावित, खा.डॉ.हिना गावित, डॉ.सुप्रिया गावित यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत नेत्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.जिल्ह्याच्या विकासासाठी डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमची स्थापना होणे हे खरेच स्वागत करण्यासारखे आहे. मात्र त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी व्हावा हे योग्य नव्हे असे सुज्ञ नागरिक चर्चा करताना दिसत आहेत.
आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या आ. आमश्या पाडवी यांनाही वगळले
आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्यांमध्ये सध्या आ. आमश्या पाडवी यांचा अग्रक्रम लागतो असे म्हणणे वावगे ठरणार नाही.जिल्ह्याच्या विविध समस्यांबाबत, आदिवासींच्या हक्कासाठी आ. आमश्या पाडवी यांनी विधान परिषदेत अनेक वेळा आवाज उठवला आहे.असे असताना त्यांचेही नाव आमंत्रण पत्रिकेत न्हवते.डॉ.गावित यांना आमंत्रण का नाही असा प्रश्न उपस्थित होत असताना आयोजकांनी गावित परिवार सत्तेत असल्याचे सांगितले. मात्र आ.आमश्या पाडवी हे सत्ते विरोधात लढत असताना त्यांचा ही आयोजकांना विसर पडल्याने चित्र दिसले.
नंदुरबार जिल्ह्यात भाजपाचा खा.होण्यासाठी आ.के.सी.पाडवी यांची मुक संमती ?.
डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम ‘मुहूर्तमेढ विकसित नंदुरबारची ‘या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी भाषणे झाली यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी भाषणात सांगितले की, आ.राजेश पाडवी यांनी आमदार असताना मोठ्या प्रमाणात निधी आणला खासदार झाले तर किती निधी आणणार असे सांगत भविष्यातील खासदार होण्याच्या शुभेच्छा दिल्या. असे सांगत असताना तेथे माजी मंत्री आ.के.सी.पाडवी हेही उपस्थित होते.त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आगामी निवडणुकीत भाजपाचा खासदार होण्यासाठी आ.के.सी.पाडवी यांची मुक संमती आहे की काय असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
सोयीचे राजकारण : आपण एकमेकांचे पाय ओढू नये
डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमच्या बैठकीत अनेक मान्यवरांनी आपण एकमेांसोबत राहून काम करू
आपण एकमेकांचे पाय ओढू नये असेही सांगितले. यावेळी पश्चिम महाराष्ट्रमधील नेत्यांचे उदाहरण देण्यात आले.निवडणुकी नंतर राजकीय मतभेद विसरून सर्व पक्षांनी जिल्ह्याच्या विकासाठी एकत्र येणे योग्यच आहे.मात्र नंदूरबार जिल्हयात सोयीचे राजकारण करण्यात येथे दोन दिवसांपूर्वी नंदूरबार तालुक्यातील धानोरा येथे शिंदे शिवसेना गटाचा मेळावा झाला त्यात नवापुरची जागा शिंदे शिवसेना गटाला मिळावी असा निर्धार करण्यात आला.नवापूर विधानसभेतून आ. शिरिषकुमार नाईक हे विद्यमान आमदार आहेत.त्यांच्या विरोधातच उमेदवार उभा राहील का? जर राहिलाच तरी तो कसा लढेल हा संशोधनाचा विषय आहे. माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व शिरीषकुमार नाईक यांचे संबंध सर्वश्रुत आहे.अशा अनेक बाबिबाबत सोयीचे राजकारण बघायला मिळत आहे.








