नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील पूर्व भागातील शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी धानोरा येथे आयोजित मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला जागा मिळावी असा निर्धार केला. शिवसेनेला जागा मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार असल्याचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.
धानोरा ता.नंदुरबार येथे पूर्व भागातील कार्यकर्त्यांच्या शनिवारी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मेळावा झाला. मेळाव्याचे उद्घाटन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विक्रमसिंह वळवी यांनी केले.
यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, पहिले जिल्हा परिषद व आताचा जिल्हा परिषदेच्या कामकाजात फार मोठा फरक आहे. तालुक्यातील जनतेची सेवा करण्याचे व्रत आम्ही हाती घेतलेलं आहे. शिवसैनिकांमध्ये एवढी ताकद आहे की, जिल्ह्याला पक्षातून किमान दोन तरी आमदार देऊ शकतात. जिल्हा परिषदेतून सत्ता गेली तरी सदस्य जनतेची कामे करीत आहेत. जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी म्हणाले, आदिवासी समाजाने नेहमी जिल्ह्याला दिशा दाखवलेली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत आमच्या उमेदवार पराभूत झाला. जे निवडून आले त्यांनी समाजाचे हितच पाहिले नाही. निवडणूक संपली की राजकारण देखील संपायला पाहिजे. जनतेला योजनांच्या माध्यमातून लाभ दिला पाहिजे हे लोकप्रतिनिधींचे काम असते.
याप्रसंगी पालिकेच्या माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, पं.स सभापती दीपमाला भील,उपसभापती तेजस पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योती राजपूत शेतकी संघाचे चेअरमन बी.के पाटील,नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विक्रमसिंह वळवी,जि.प सदस्य देवमन पवार, अल्पसंख्यांक सेल जिल्हाप्रमुख परवेज खान, नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन बकाराम गावित,माजी जि.प अध्यक्ष रमेश गावित, किसान सेलचे अध्यक्ष वकील पाटील, युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रेम सोनार,माजी जि.प सदस्य तानाजी वसावे,माजी नगरसेवक कैलास पाटील, पं.स माजी उपसभापती प्रल्हाद राठोड, पं.स सदस्य कमलेश महाले, धर्मेंद्र परदेशी, अंजना वसावे, सुनील वसावे, धानोरा सरपंच रीना पाडवी, जोगणीपाडा सरपंच नितेश वळवी, उपसरपंच अशोक नाईक आदी उपस्थित होते.
सदस्य अभियान नोंदणी
कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना सदस्य अभियान राबविण्यात आले. एका डिजिटल फलकावर १० अंकी नंबर देण्यात आला होता. त्यावर मिस कॉल व क्यूआर कोड स्कॅन करून असंख्य ग्रामस्थांनी प्राथमिक सदस्यत्वाची नोंदणी केली.
पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
मेळाव्यात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हाप्रमुख राम रघुवंशी,जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
म्हणून शिवसैनिकांचा निर्धार
नवापूर विधानसभा मतदारसंघातून आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार निवडून आलेला नाही. भाजप शिवसेनेची युती असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नवापूरसाठी शिवसेनेला जागा देऊन उमेदवार उभा करावा असा एकमुखी निर्धार मेळाव्यातून करण्यात आला.








