नंदुरबार l प्रतिनिधी
पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील पशुपालक, व शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विषयक एक दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणार असून प्रशिक्षण शिबीरासाठी जिल्ह्यातील पशुपालक व शेतकऱ्यांनी नांव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उ. दे. पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या शिबीरात पशुपालक, शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन, दुग्धउत्पादन, शेळी, मेंढी पालन व व्यवस्थापन, वराह पालन, कुक्कुट पालन व्यवसाय व व्यवस्थापन, वैरण उत्पादन व मुरघास निर्मिती, याबाबत तज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी प्रामुख्याने पशुसंवर्धन विभागाच्या व्यक्तीगत लाभाच्या राज्यस्तरीय व जिल्हा वार्षिक योजनांमध्ये चालू व मागील दोन वर्षात अंतिम निवड झालेल्या लाभार्थीनी या प्रशिक्षण शिबीरात सहभाग नोंदवावा. तसेच इतर व्यवसाय करणारे व व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असणाऱ्यांनीही आपला सहभाग नोंदवावा.
या प्रशिक्षण शिबीरात नांव नोंदणीसाठी प्रशिक्षणार्थीनी विहीत नमुन्यातील अर्ज भरून संबंधीत कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखान्याचे संस्था प्रमुख किंवा पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्या शिफारसीसह पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयास सादर करावा. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधीत कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, नंदुरबार येथे उपलब्ध आहेत, असेही श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.








