नंदुरबार l प्रतिनिधी
सिदाजी आप्पांचे चांगभले अन राधे राधे,हर हर महादेव चा जयघोष करीत भगवे फेटे परिधान करून डीजे वरील भक्ती गीतांच्या तालासुरात वीरशैव लिंगायत गवळी समाजातील महिला व युवती शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.
वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे गुरुवर्य परमपूज्य बालब्रम्हचारी श्री सिदाजीआप्पा देवर्षी तसेच राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठे निमित गवळी समाजातील जेष्ठ कारभारी,पंच मंडळी व युवकांचा देखील मिरवणुकीत अभुतपूर्व जल्लोष दिसून आला.ढोल ताशांच्या गजरात शालेय विद्यार्थी आणि युवकांनी सहभाग नोंदविला. नववर्षाच्या प्रारंभी सोमवारी शहरातून निघालेल्या बालब्रह्मचारी सिदाजीआप्पा देवर्षी आणि राधाकृष्ण मूर्ती शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.दरम्यान उद्या बुधवारी महाप्रसाद (भंडारा) वाटपाने दोन्ही मंदिर जिर्णोद्धार आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा समारोप होईल.
नंदुरबार येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे गुरुवर्य परमपूज्य बालब्रम्हचारी श्री सिदाजीआप्पा देवर्षी तसेच राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठे निमित सोमवार दि. 1 जानेवारी रोजी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली. नंदेश्वर चौक, गवळीवाडा येथे नंदुरबार वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे बालब्रह्मचारी श्री सिदाजी आप्पा देवर्षी आणि राधाकृष्ण यांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मोठा मारुती मंदिरापासून सजविलेल्या वाहनावरून मूर्तींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मोठा मारुती मंदिर,सोनी विहीर, देसाईपुरा,अमर अमृत रोड,मंगळ बाजार, सुभाष चौक,जुनी नगर पालिका,आमदार कार्यालय,अंधारे चौक,स्टेट बँक, नाट्यमंदिर,धुळे नाका कुंभारवाडामार्गे गवळी वाड्यातील नंदेश्वर चौकात मिरवणूक पोहोचली.मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी महिला व भाविकांनी आरती करून फुलांची उधळण केली.मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.
मूर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त गवळी वाडा परिसरातील मंदिरां जवळ भगव्या पताका आणि ध्वजांनी सुशोभिकरण करण्यात आले .शोभा यात्रेनंतर गवळी वाड्यात पुरोहितांच्या साक्षीने तसेच पाच जोडप्यांच्या उपस्थितीत धार्मिक पूजाअर्चा करण्यात आली. मिरवणूक समाप्तीनंतर गवळीवाड्यात सहभागी सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. उद्या बुधवार दि. 3 जानेवारी रोजी महाआरती होईल. दुपारी 12 वाजेपासून महाप्रसाद (भंडारा) वाटप करण्यात येईल. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन नंदुरबार वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे करण्यात आले आहे.








