नंदुरबार l प्रतिनिधी
गुन्हेमुक्त गांव योजनेची जिल्ह्यात सुरुवात झाली असून नवापूर तालुक्यातील गडद येथे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या ” गुन्हेमुक्त गांव ” या योजनेचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.श्री.बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील गडद या गावाला भेट देवून उद्घाटन करुन सुरुवात करण्यात आली. गुन्हेमुक्त गांव मोहिमेंतर्गत पहिल्या टप्यात जिल्ह्यातील 14 गावांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी सांगितले की, भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांचा विकास झाला तर देशाचा विकास आपोआप होत असतो. गदड गाव हे नावाप्रमाणेच वृक्षांनी गडद आहे त्यात अधिक प्रयत्न करुन जास्तीत जास्त वृक्षारोपन करावे. गुन्हे मुक्त गाव मोहिमेंतर्गत गडद गावात जिल्हा पोलीस दलामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

गावातील किरकोळ स्वरुपाचे वाद मानवी जीवनात आयुष्यभर सुरु राहतात आणि त्याचा परिणाम येणाऱ्या पिढीवर होत असतो. त्यामुळे वर्षानुवर्षे नात्यात कटुता राहते. किरकोळ स्वरुपाचे वाद सामोपचाराने गावातच मिटले तर त्याचा फायदा निश्चितच गावाला होत असतो. त्याचबरोबर मानवी जीवनात व्यसनमुक्ती फार महत्वाची आहे. मनुष्याला एक वेळा व्यसन लागले तर ते सोडणे खूप अवघड असते. त्यामुळे गावात नशाबंदी आवश्यक आहे. गावातील तरुणांनी जास्तीत जास्त स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करावा.
गावातील एखादा तरुण अधिकारी झाला तर ते गावातील सर्वानांच आवडते आणि त्याचा आनंद सर्व गाव साजरा करीत असतात “असे सांगून गडद गावात वाचनालय सुरु करण्यासाठी 5000 रुपयांचे बक्षिस जाहिर केले. गाव शांत असेल, वादविवाद नसतील तर त्याचा फायदा निश्चितच गावाला आणि पर्यायाने पोलीस दलाला होतो असे सांगून गुन्हेमुक्त गाव राहण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी अधिक प्रयत्न करावे आणि जिल्हा पोलीस दलामार्फत सुरु असलेला गुन्हेमुक्त गाव मोहिमे गडद गावातील सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा असे पुढे सांगून गडद गावातील पोलीस पाटील, तंटामुक्त गांव मोहिम अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच यांचे गांव गुन्हेमुक्त करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करुन गडद गावाच्या सर्व नागरिकांचे अभिनंदन केले.
तसेच पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दल कायदा व सुव्यवस्था, गुन्हे उघड करणे इत्यादींबरोबरच कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत राबवित असलेल्या योजनांबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या सह नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे कौतूक करुन या योजनांबाबत समाधान व्यक्त केले.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले की, “गांव पातळीवर अत्यंत किरकोळ कारणांवरून वाद निर्माण होत असतात. सुरुवातीला यात मोजके लोक गुंतलेले असले तरीही किरकोळ वादाचे निराकरण न झाल्याने छोटे वाद मोठे होतात व यात अधिकाधिक लोक गुंतूनजातात. यात किरकोळ वादाचे निराकरण न झालेल्या वादांमुळे पुढे सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होवू शकतो व त्यातूनच फौजदारी व दिवाणी स्वरुपाचे गुन्हे, दावे दाखल होत असतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर गावातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण वर्गाचे व शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचे मोठे नुकसान होत असते. कौटुंबीक वादामुळे अनेक संसार उध्वस्त होतात. जिल्हा पोलीस दलाने ” गुन्हेमुक्त गाव ” या अभियानांतर्गत गडद ता. नवापूर येथे विविध उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
यात जिल्हा पोलीस दलाकडून नशाबंदी जनजागृती, अवैध धंदे जनजागृती, सायबर क्राईम जनजागृती, महिलांविषयी गुन्हे जनजागृती, वाचनालय, वृक्षारोपण, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, महिलांना सन्मानाची वागणूक, ग्रामरक्षा, कायदेविषयक कार्यशाळा, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, बालविवाह प्रतिबंध (ऑपरेशन अक्षता), हेल्मेट जनजागृती, वाहन परवाने शिबीर, वाहतूक नियम जनजागृती, व्यायामशाळा, आरोग्य शिबीर, डी.जे.डॉल्बीमुक्त अभियान, मोबाईल / टी.व्ही. चा विद्यार्थ्यांकडून नियंत्रीत वापर, पोलीस दादाहा सेतू, अंधश्रध्दा निर्मूलन कार्यक्रम, क्रिकेट / कबड्डी सामने इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.”
कार्यक्रमाला उपस्थित गडद गावाचे सरपंच दिनकर गावीत यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, गुन्हेमुक्त गाव मोहिमेसाठी गडद गावाची निवड केल्याबद्दल जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त करुन गाव भविष्यात देखील गुन्हेमुक्त राहिल अशी गावकऱ्यांच्यावतीने ग्वाही देतो. तसेच या मोहिमेमध्ये गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे सांगितले.
गुन्हेमुक्त गांव मोहिमेंतर्गत पहिल्या टप्यात नवापूरमधील गडदसह जिल्ह्यातील नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील दुधाळे, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील वडझाकण, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पिंप्री, विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील निंबोणी, शहादा पोलीस ठाणे हद्दीतील धांदरे व लोहारा, धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील पिंपरी, सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील कवठळ, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील दरा, अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील जांभली व नयनशेवडी, तळोदा पोलीस ठाणे हद्दतील उमरकुवा, मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील वेलखेडी असे एकूण 14 गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आलेली आहे.
गुन्हेमुक्त गांव या मोहिमेमध्ये पोलीस ठाणे स्तरावर समिती स्थापन करण्यात आलेली असून या समितीमध्ये संबंधीत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, बीट अंमलदार, पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्त गांव मोहिम अध्यक्ष इत्यादींचा समावेश असणार आहे. तसेच या समितीमार्फत गाव पातळीवरील लहान वाद ओळखून समुपदेशन करणे, वाद होवूच नये या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, गावात सलोखा व सार्वजनिक शांतता प्रस्थापित करणे, गावातील नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन करणे, गावातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवणे, महिला अत्याचाराविषयी जनजागृती करणे, विद्यार्थ्यांना गुन्हेगारीपासून लांब ठेवणे, कौटुंबिक वादाचे निराकरण करणे, बालविवाहास प्रतिबंध करणे, व्यसनमुक्तीचा प्रचार करणे इत्यादी कार्य केले जाणार आहे.
सदर कार्यक्रमाच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अमंलदार, गडद गावाचे सरपंच दिनकर गावीत, पोलीस पाटील शिरीष मावची, तंटामुक्त गांव मोहिम अध्यक्ष गोबजी गावीत, प्रतिष्ठीत नागरिक, गडद गावाचे पोलीस स्वयंसेवक व गावातील नागरिक उपस्थित होते.








