नंदुरबार l प्रतिनिधी
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत असताना शिरपूर (जि.धुळे) येथील वर्चस्व गणेश मित्र मंडळाने नंदुरबार येथील मूर्तिकराकडून श्री गणरायाची मूर्ती घेऊन देखील नंतर पैसे देण्यास नकार दिला.अखेर नंदुरबार च्या मूर्तिकाराने याप्रकरणी पोलिसांकडे धाव घेत शिरपूर च्या वर्चस्व गणेश मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यां विरुद्ध फसवणुकिचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.17 ऑगस्ट 2023 रोजी शिरपूर येथील वर्चस्व गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी नंदुरबार येथे येऊन कोकणी हिल परिसरातील मूर्तिकार प्रशांत रामकृष्ण बागुल यांच्याकडे सुमारे 91 हजार रुपयाची विश्वकर्मा प्रतिरूप गणेश मूर्ती बुक केली होती. त्याच दिवशी ॲडव्हान्स म्हणून आठ हजार रुपये अदा केले आणि उर्वरित रक्कम 83 हजार रुपये मूर्ती घेऊन जाण्याच्या दिवशी अदा करण्याची हमी दिली होती.
वर्चस्व गणेश मित्र मंडळ शिरपूर यांचे अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकारीणी सदस्य यांच्यावर असलेल्या विश्वासा खातर मूर्तिकार प्रशांत बागुल यांनी मूर्तीची नोंदणी करून घेतली. त्यानंतर दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी वर्चस्व गणेश मित्र मंडळ शिरपूर यांच्या पदाधिकाऱ्यांनी बुक केलेली मूर्ती त्यांच्या वाहनावर ठेवून घेतली.मूर्ती नेण्याच्या वेळी केवळ 37 हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम शिरपूरहून पाठवून देतो अशी बतावणी केली होती.मात्र मूर्तिकार बागुल इतर मूर्तिकारांची मूर्ती देण्यात व्यस्त असल्याची संधी साधून शिरपूरच्या वर्चस्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्तीचे उर्वरित 46 हजार रुपये न देता निघून गेले.
त्यानंतर वारंवार फोन करून देखील प्रतिसाद देत नसल्याने वर्चस्व मंडळाचे अध्यक्ष किरण कोळी यांच्याकडे मूर्तीचे थकीत रकमेबाबत फोन केला असता कायम उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर दि.4 नोव्हेंबर रोजी नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला. मात्र त्यावर काहीच कार्यवाही न झाल्यामुळे मूर्तिकार प्रशांत बागुल यांनी दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. मात्र पोलीस प्रशासनातर्फे एक महिना उलटूनही कुठल्याही कार्यवाही बाबत खुलासा झालेला नाही.








