नंदुरबार l प्रतिनिधी
अभ्यास करताना चार आर चा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर आपण कोणत्याही परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चिती करुन अभ्यासाला सामोरे जावे, असे आवाहन नंदुरबारचे अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी केले. टीटीएसएफ या सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित युवा स्पर्धा परीक्षा महामेळावा व यशवंतांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे दरवर्षी राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे, याविषयी विविध ठिकाणी मेळावे व परीक्षा घेऊन खऱ्या अर्थाने हुशार व गरजू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना वर्षभर स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाते. लोकसेवा आयोग व इतर आयोगांमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संस्थेमार्फत दरवर्षी गौरव केला जातो. यंदाही यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि महा युवा स्पर्धा परीक्षा मेळावा २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन नंदुरबार येथील निलेश लोंस च्या सभागृहात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वन अधिकारी सुरेश मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी डॉ.अर्जुन पावरा आणि मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात निलेश तांबे यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधनपर मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास करताना आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. तुम्ही ध्येय निश्चित करून अभ्यासाला लागला तर अभ्यास करताना चार आर या युक्तीचा विचार करून अभ्यास केला पाहिजे. वाचन, ध्यान, मनन व प्रसरण (फोर आर) या पद्धतीने अभ्यास केल्यास आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी या विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वस्तू व सेवा कर आयुक्त अजय खर्डे यांनी सांगितले की, टी टी एस एफ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र काम करत आहे. विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला तर संस्था अधिक जोमाने काम करू शकते. आतापर्यंत जे जे विद्यार्थी संस्थेच्या संपर्कात आले त्यांना उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले व अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन विविध पदांवर विराजमान झाले. गेल्या दहा वर्षांपासून संस्था काम करत असून यापुढेही संस्थेचे काम अविरत सुरू राहील. समाजातील विविध मान्यवरांच्या आर्थिक व मानसिक पाठबळावर आम्ही हे काम करू शकत आहोत. विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, टी टी एस एफ ही संघटना अत्यंत मूल्यवान असे काम करत आहे. या संघटनेच्या पाठीशी संपूर्ण समाज तन, मन आणि धनाने उभा असून, अजय खरडे यांच्या प्रयत्नांना नक्कीच भविष्यात चांगले यश येईल व समाजातून अनेक अधिकारी निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सुरुवातीला दीप प्रज्वलन करून व उपस्थित मान्यवरांचे मंगल वस्त्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विविध स्पर्धा परीक्षांत भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यात प्राविण्य प्राप्त केलेल्या सुपर थर्टी विद्यार्थ्यांचा प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला.
त्याचप्रमाणे समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कलागुण प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. संघटनेच्या तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचाही गौरव करून सर्वांना प्रेरीत करण्यात आले. कार्यक्रमाला राज्यभरातील विविध भागातून विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








