नंदुरबार l प्रतिनिधी
गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक करून वाहनासह 2 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ मुक्त जिल्हा ( Drugs Free District) या संकल्पनेची सुरूवात करुन वर्षभरापासून नंदुरबार जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाया सुरु आहेत. अंमली पदार्थ मुक्त झालेला नंदुरबार हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. नंदुरबार जिल्हा भविष्यातही अंमली पदार्थ मुक्त राहिल यासाठी काटेकोरपणे लक्ष ठेवले जाईल. तसेच अंमली पदार्थाची लागवड, शेती, वाहतूक इत्यार्दीवर प्रभावी कारवाई करण्यासाठी ड्रोन व इतर तंत्रज्ञानाचा वापर देखील केला जाईल. अंमली पदार्थ विरोधी कारवायांमध्ये अजून वाढ करुन जिल्ह्यात कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थांना थारा असणार नाही.
तसेच अंमली पदार्थाची लागवड करुन त्याची जोपासना करणे, अंमली पदार्थांची वाहतूक करणे, अंमली पदार्थ कब्जात बाळगणे, विक्री इत्यादींवर जास्तीत जास्त कारवाई करण्याच्या कडक सूचना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या,
तसेच पोलीस ठाणे व जिल्हा स्तरावर विविध पथकांची निर्मिती करण्यात आली असून सदरची पथके अंमली पदार्थांवर कारवाई करणेसाठी सतत विविध भागात फिरत असतात. त्याचप्रमाणे अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी व जंगल परिसरात लपवून अंमली पदार्थाचा साठा शोधून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अशा ठिकाणांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेणेबाबत दिलेल्या सूचनांनुसार ड्रोनचा वापरही केला जात आहे.
18 डिसेंबर 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा पोलीस ठाणे हद्दीतील वडगांव ते तितरी दरम्यान रोडवर कपाशी पिकाचे शेताच्या बाजूला एक चारचाकी वाहन संशयास्पदरित्या बेवारस उभी आहे. सदरची माहिती त्यांनी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना कळवून बातमीची खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पथकासह शहादा पोलीस ठाणे हद्दीतील वडगांव ते तितरी दरम्यान बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या वाहनाची पाहणी केली असता वाहनाचे सर्व दरवाजे व डिक्की लॉक असल्याचे व वाहनाजवळ कोणीही दिसून येत नसल्याचे निदर्शनास आले. म्हणून शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी वाहनाला असलोद दुरक्षेत्र येथे आणून मॅकेनिककडून वाहनाची डिक्की व दरवाजे उघडून पाहिले असता डिक्कीमध्ये दोन प्लॅस्टीक बॉक्स व साड्यांमध्ये बांधलेले दोन गाठोडे मिळून आले. त्यामध्ये 90 हजार 700 रुपये किमतीचा 08 किलो ।। ग्रॅम वजनाचा सुका गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळून आल्याने तो कायदेशीर प्रक्रिया करुन गुन्ह्याच्या पुढील तपासकामी जप्त करण्यात आला.
शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी त्यांच्या पथकाला वाहन मालकाचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्याबाबत आदेशीत केल्याने शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने वाहन मालकाचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले, ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता वसंत सुरेश पावरा रा. जाम ता. शहादा जि. नंदुरबार, प्रदीप चुनिलाल जाधव रा. वाघडे ता. शहादा जि. नंदुरबार असे सांगितले. त्यांना चारचाकी वाहन व वाहनामध्ये मिळून आलेला गांजा सदृष्य अंमली पदार्थाबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता त्यांनी तो गांजा विक्री करण्यासाठी घेवून जात असलेबाबत सविस्तर माहिती सांगितली.
शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने वसंत सुरेश पावरा रा. जाम ता. शहादा जि. नंदुरबार, प्रदीप चुनिलाल जाधव रा. वाघडे ता. शहादा जि. नंदुरबार यांना ताब्यात घेवून 90 हजार 700 रुपये किमतीचा 8 किलो 11 ग्रॅम वजनाचा सुका गांजा सदृश्य अंमली पदार्थ व 2 लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन क्रमांक GJ-05 JK-6242 असा एकुण 2 लाख 90 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केला आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांविरुद् शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 709/2023 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 कलम 8 (क), 20 (ब), 20 (2) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण, सहा. पोलीस उप निरीक्षक प्रदीप राजपुत, पोलीस हवालदार अशोक कोळी, पोलीस नाईक घनश्याम सुर्यवंशी, योगेश थोरात, संदीप लांडगे, पोलीस अंमलदार राकेश मोरे, भरत उगले, मिथून शिसोदे यांचे पथकाने केली आहे.








