नंदुरबार l प्रतिनिधी-
सीमांच्या रक्षणासाठी व देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सैनिकांनी आपले जीवन अर्पिले,आता आपली वेळ आहे. सर्वांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करुन या महान राष्ट्रकार्यास हातभार लावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी च्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रविण अहिरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सतिष चौधरी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ निलेश पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय या कार्यक्रमास उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या, दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून उत्साहपूर्वक पाळला जातो. या दिवशी सशस्त्र सेनेचा ध्वज लावून सेनादल देशासाठी जे कार्य करतात, त्यांचा दृढ ऐक्याला नागरिक बळकटी लावतात. तसेच या दिवशी, समाज सशस्त्र सेना ध्वज निधीस आपला हातभार लावून आजी व माजी शूर सैनिकांच्या प्रती ज्यांनी देशासाठी आपले जीवन अर्पिले, त्यांचे प्रती नागरिक कृतज्ञता व त्यांची गुणग्राह्यता व्यक्त करतात.
या निमित्ताने संकलित होणारा निधी युद्ध विधवा, अपंग सैनिक, आजी व माजी सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या पुनर्वसनासाठी राज्यस्तरावर सैनिक कल्याण विभागाने आखलेल्या कल्याणकारी योजनांवर खर्च केला जातो. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 लाखांच्यावर सैनिक व त्यांचे कुटुंबिय आहेच. हा कार्यक्रम अर्थपूर्ण होण्याच्या कामी सर्वांचा उदारतेने व स्वयंस्फुर्तीने सहभाग व मोठे सहाय्य हवे आहे, असेही यावेळी श्रीमती खत्री यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर पाटील यावेळी म्हणाले, पोलीस दलामार्फत दरवर्षी ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. तसेच याव्यतिरिक्त दरमहा आमच्याकडून ठराविक रक्कमही निधीसाठी जमा होत असते. पोलीस विभागातील भरती प्रक्रियेतही माजी सैनिकांसाठी जागा राखीव असतात. वर्षभरातही सैनिकांसंदर्भातले प्रश्न जास्तीत जास्त सोडविण्यासाठी पोलीस दलाची प्रयत्न असतो. तसेच यापूढील काळातही पोलीस विभागामार्फत निधी संकलनात विशेष सहकार्य करण्यात येईल.
अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, सैनिक हा ऐन तारुण्यातील 20 ते 25 वर्षे सैन्यात घालवतो व हजार किलोमीटर राहून देशसेवा करत असतो. त्यामुळे आपल्या दैनंदिन खर्चातून किमान कमीत कमी रक्कमही ध्वजदिन निधीस दिली तर ती सर्वात मोठी देशसेवा होईल. ऐन उमेदीमध्ये ज्यांनी आपले जीवन खर्ची घातले आहे. त्यांना किंवा त्यांच्या कुटूंबियांसाठी आपणही आपल्या उमदेमध्येच काहीतरी उत्तरदायी म्हणून राहणे अत्यंत आवश्यक आहे.
यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सतिष चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी आपल्या प्रस्ताविकास सांगितले की, ध्वजदिन निधी संकलनामागील भूमिका विषद करुन त्यांनी सांगितले की, जिल्ह्याला गेल्या वर्षी 36 लाख 30 हजार रुपये निधी संकलनाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी जिल्ह्याने 37 लाख 84 हजार इतका निधी संकलीत करुन 104.25 टक्के म्हणजेचे उद्दिष्टापेक्षा अधिक निधी संकलीत झाला आहे. याबद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शैक्षणिक संस्था व जिल्हा परिषद, नागरिक तसेच सर्व देणगीदारांचे आभार मानून मागील वर्षी दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे यावर्षीही उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी निधी संकलन-2022 मध्ये 100 टक्के पेक्षा जास्त निधी संकलन केलेल्या कार्यालयांचा, धव्जनिधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दानशूर नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच विरपत्नी माधुरी पाटील यांचा तसेच माजी सैनिक रुपसिंग बिरबा पाडवी यांना आदिवासी सेवक पुरस्कार मिळाल्याबाबत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी दीपप्रज्वलन करुन शहीदांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. श्रॉफ हायस्कुलच्या शिक्षिका श्रीमती जोशी त्यांच्या चमूने देशभक्तीपर व स्वागत गीत सादर केले. त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांनी बिगुल वाजवून शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी सैनिक मनोज पाटील, विष्णू जोधळे यांनी केले. आभार प्रदर्शन जितेंद्र सरोदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभेदार मेजर रामदास पाटील, सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी- कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.