नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील धुळे रस्त्यावरील श्री काशिनाथ बाबा मंदिर सेवा समितीतर्फे तब्बल 28 वर्षानंतर झालेल्या खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धांना मंगळवारी अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. या खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धांमध्ये लहान मोठ्या 103 पेक्षा अधिक कुस्त्या लावण्यात आल्या.
सत्तर वर्षीय जेष्ठ मलांची कुस्ती बरोबरीत सोडण्यात आली.तर मुलींच्या कुस्तींमध्ये मध्यप्रदेश राज्यातील खंडवा येथील हर्षी व पारुल चावरे या विजेता ठरल्या. सच्चिदानंद व्यायाम शाळेची ज्योती साळवे हिने चांगली लढत दिली. शेवटची कुस्ती चाळीसगाव येथील बलभीम व्यायाम शाळेचा मल्ल शक्ति राठोड आणि बळसाणे येथील हनुमान व्यायाम शाळेचा मल्ल गणेश कुराडे यांच्यात जंगी लढत झाली.यात गणेश कुराडे याने बाजी मारली.
धुळे रस्त्यावरील घोडा मैदान येथे सर्वप्रथम शक्तीदुत हनुमानाच्या प्रतिमेचे आणि आखाडा पूजन करण्यात आले.सायंकाळी उशिरापर्यंत प्रकाश झोतात चाललेल्या कुस्ती पाहण्यासाठी नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील मल्ल आणि कुस्ती प्रेमींनी हजेरी लावली होती.
नंदुरबार येथील सच्चिदानंद व्यायाम शाळेचे ज्येष्ठ मल्ल अरविंद राजपूत आणि बळसाणे येथील सलीम पैलवान यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली. माजी नगराध्यक्ष रवींद्र परदेशी,पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार,नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे युवा सदस्य प्रथमेश चौधरी,उपाध्यक्ष बलवंत जाधव, हेमराज मराठे पैलवान, मोहिनीराज राजपूत,माजी उपनगराध्यक्ष शाम मराठे,दोंडाईचा येथील पंढरीनाथ राजपूत,निंबा ठाकूर उपस्थित होते.
कुस्तीचे पंच म्हणून मारुती व्यायाम शाळेचे पैलवान अर्जुन मराठे तसेच जय हनुमान व्यायाम शाळेचे पैलवान लल्ला मराठे यांनी काम पाहिले.तर कुस्तींचे सूत्रसंचालन संयोजक महादू हिरणवाळे व जय मराठे यांनी केले. कुस्ती स्पर्धा यशस्वीतेसाठी शिवम मराठे, बापू महाले, दादू बडगुजर, संभाजी हिरणवाळे, जी.एस. गवळी, गोपाल हिरणवाळे, काशिनाथ हिरणवाळे, विशाल हिरणवाळे, राजेंद्र लगडे (वावद) यांच्यासह शहरातील विविध व्यायाम शाळेच्या मल्लांनी परिश्रम घेतले.