नंदुरबार l प्रतिनिधी
पवन ऊर्जा जमीन हक्क आदिवासी संघर्ष समितीचे एकदिवशी उपोषण संपन्न झाले असून आठ दिवसात निर्णय न झाल्यास पोल हटाव – जमिन बचाव आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षापासून सुझलॉन व सर्जन रियालिटीज कंपनीने या भागातील निरक्षर गरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या वडीलोपार्जित जमीनीवर खोटे दस्ताऐवजाद्वारे शेतीवर बेकायदेशीर अतिक्रमण करुन या आदिवासी शेतकऱ्यांना जीवन जगण्यापासून शेती नासधूस केल्याने जगणे वंचित केले आहे . ते आज मोलमजुरीसाठी गुजरात व इतर भागात पोटापाण्यासाठी वनवन भटकत आहेत .
याला सर्वस्वी कार्पोरेट कंपनी सुझलॉन व तिची उपकंपनी सर्जन रियालिटीज व ३७० टॉवर मालक यांची आदिवासी विरोधी धोरणे जबाबदार आहेत . या कंपनीने या भागात शासनाचे सर्व महसुली कायदे व नियम पायदळी तुडवत जिल्हाधिकारी सारख्या सक्षम अधिकारी ज्यांची नेमणूक आदिवासींच्या हितासाठी या आदिवासी बहुल जिल्ह्यात झालेली आहे , त्या सर्वांची या कंपनीने दिशाभूल करून आदिवासी व शासनाची फसवणूक केली आहे व करीत आहे.
या कंपनीने टॉवरमधून निघणाऱ्या विजेला वाहून नेण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतातून पोल , रस्ते , जनित्र हे शासन परवानगी व आदिवासी शेतकऱ्यांची परवानगी न घेता वापर केला आहे त्यासाठी आदिवासी शेतकन्यांकडून बोगस दस्ताऐवज त्यांच्या गरीबी व अज्ञानांचा फायदा घेत बोगस कागदपत्रे बनवून ती आपल्या कार्यालयाकडे जमा केली आहेत . ती आमच्या समितीने व शेतकऱ्यांनी यापूर्वीच नाकारलेली आहेत . व त्या कागदपत्रांची आंदोलनाद्वारे होळी केली आहे . म्हणून आम्ही हे अवैधरित्या टाकलेले पोल व रस्ते काढून टाकण्यासाठी कंपनीने स्वतःहून काढून घ्यावेत यासाठी मागील काळात पोल हटाव आंदोलन केले होते . तरी देखील कंपनी काही निर्णय घेण्यास तयार नाही. म्हणून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पवन ऊर्जा जमीन हक्क आदिवासी कामगार संघर्ष समितीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महसूल प्रशासन, समिती, शेतकरी व पवन ऊर्जाचे पदाधिकारी यात चर्चा संपन्न झाली . या चर्चा मध्ये 8 दिवसाचा अवधी देण्यात आला आहे परंतु या 8 दिवसात जर योग्य निर्णय लागला नाही तर पोल हटाव- जमीन बचाव आंदोलन समितीच्या वतीने करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण रामराजे उत्तर महाराष्ट्र सचिव भीमसिंग पाडवी तसेच आदिवासी शेतकरी बांधव उपस्थित होते.