नंदुरबार l प्रतिनिधी-
अपहरण करुन लैंगिक अत्याचारासह खून करणाऱ्या आरोपीतास शहादा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा देत 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अधिक माहिती की, आरोपी कमलसिंग करतारसिंग शिकलीकर याने फिर्यादी यांची पिडीत अल्पवयीन मुलगी हीस मिर्ची पावडर आणण्याच्या बहाण्याने बोलावुन घेवुन तो राहत राहत असलेल्या घरात जबरदस्तीने घेवुन गेला तेथे तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार करुन बलात्कार केली. त्यानंतर तिस जिवे ठार मारुन टाकले व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अंधाराचा फायदा घेत तिचे प्रेत शेजारील घरात फेकुन दिले होते,
म्हणून फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 302, 376(2)(1), 376(A), 363, 201 सह लैंगिक आत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 कलम 4 व 6 प्रमाणे 23 जानेवारी 2019 रोजी आरोपीताविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा अपहरण करुन लैंगिक अत्याचारासह खून करणे यासारखा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपी कमलसिंग करतारसिंग शिकलीकर वय-30 रा. सोरापाडा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार यास तात्काळ अटक करण्यात आली होती.
अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी कमलसिंग करतारसिंग शिकलीकर रा. सोरापाडा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार याच्या विरुद् दोषारोपपत्र अति. सत्र न्यायाधीश, शहादा यांचे न्यायालयात सादर केले होते.
अति. सत्र न्यायाधीश, शहादा सी.एस. दातीर यांनी साक्षीदारांचे जबाब, पंच, आणि परिस्थितीजन्य पुरावे तपास अधिकारी यांची साक्ष, सरकारी पक्षाचा युक्तीवाद यासर्व बाबींचा विचार करुन आरोपी कमलसिंग करतारसिंग शिकलीकर यास भारतीय दंड संहितेच्या कलम 376 मध्ये जन्मठेपेची शिक्षा व 5000 रुपये दंड, भारतीय दंड संहितेच्या कलम 363 मध्ये 7 वर्षे कारावासाची शिक्षा व 5000 रुपये दंड, भारतीय दंड संहितेच्या कलम 302 मध्ये जन्मठेपेची शिक्षा व 5000 रुपये दंड, भारतीय दंड संहितेच्या कलम 201 मध्ये 03 वर्षे कारावासाची शिक्षा व 5000 रुपये दंड व लैंगिक आत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 6 मध्ये जन्मठेपेची शिक्षा व 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी केले असून न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड.एस. ए. गिरासे यांनी पाहिले होते. पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस उप निरीक्षक राहुल भदाणे, सहा. पोलीस उपनिरीक्षक हर्षल रोकडे, गणेश वसावे व पोलीस शिपाई देविदास सुर्यवंशी यांनी कामकाज केले आहे.
तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच जिल्हा सरकारी अभियोक्ता श्री. गोसावी, विशेष सरकारी वकील एस.ए. गिरासे यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी अभिनंदन केले आहे.