नंदुरबार l प्रतिनिधी-
मग्रारोहयोजनेअंतर्गत तालुक्यातील ४७ लाभार्थ्यांना सिंचन विहिरींसाठी १ कोटी ८८ लाखाच्या कामांचे प्रशासकीय आदेशांचे वाटप शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे सिंचन विहिरींमुळे पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
नंदुरबार तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे येत्या कालावधीत तीव्र पाणीटंचाई भासणार आहे. ग्रामीण भागात पाण्याची मोठ्या प्रमाणावर झळ बसणार असल्याने शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला. तालुक्यातील
बह्याणे,निंभेल, दहिंदुले बु.,हाटमोहिदा, भालेर,मांडळ,भोणे,पिंपलोद,आर्डीतारा,धानोरा,बलदाणे,पळाशी,उमर्देखु.,मांजरे,भादवड,अक्राळे, शिंदगव्हाण गावातील ग्रामस्थांचे सिंचन विहिरींसाठी आलेले प्रस्ताव पंचायत समितीकडून पात्र ठरल्याने त्यांना प्रशासकीय मान्यतेचे आदेशांचे वाटप मंगळवारी सभापतींच्या दालनात जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पं.स सभापती दीपमाला भील,उपसभापती प्रल्हाद राठोड,जि.प माजी सदस्य अंबु पाडवी,माजी पं.स सदस्य सुनील वसावे, धर्मेंद्र परदेसी, शिवसेना कार्यकर्ते शरद पाटील, सकासवाड्याचे सरपंच अविनाश भील, भोणे उपसरपंच राजश्री मराठे, तीसीचे सरपंच दिलीप पाटील आदी उपस्थित होते.








