नंदुरबार l प्रतिनिधी
असंख्य समाजमाध्यमांनी नागरिकांच्या जीवनावर विपरित प्रभाव टाकला असून अस्वस्थ असे जीवनमान घडत आहे. या धोकेदायक परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी ‘ डिजिटल डिटॉक्स ‘ होणे अत्यावश्यक आहे. जनजागृतीसाठी श्रॉफ हायस्कूलच्या 2000 विद्यार्थ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्रे लिहून उपक्रमाला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. तसेच आठवड्यातला एक दिवस इंटरनेट मुक्त दिवस घालवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
10 डिसेंबर हा दिवस जागतिक डिजिटल ‘ डिटॉक्स डे ‘ म्हणून साजरा करण्यात येतो. इंटरनेटच्या माध्यमातून व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम,मेसेंजर,स्नॅपचॅट यांसारखी अनेक समाजमाध्यमे तीव्रतेने कार्यरत असून नागरिकांच्या मनोविश्वाला त्यामुळे बाधा येऊ शकेल अशी परिस्थिती जागतिक पातळीवर निर्माण झाली आहे. मानवाचे भौतिक जीवन या समाज माध्यमांमुळे अस्वस्थ बनले आहे.
मनोव्यापार धोकेदायक पातळीवर येऊन पोहोचला आहे.मोबाईल प्रणीत जीवनशैली सोडून मानवाला नैसर्गिक जीवन जगता यावे, इंटरनेट व समाज माध्यमांनी निर्माण केलेले मानवी मनाचे प्रदूषण दुर सारता यावे म्हणून ‘ डिजिटल डिटॉक्स ‘ जीवनशैलीने जगण्याची आवश्यकता आहे. भारताच्या वेलनेस ॲम्बेसिडर डॉक्टर रेखा चौधरी यांनी या डिजिटल डेटॉक्स जीवनशैली बाबत आग्रही भूमिका घेतली आहे. त्यांच्या संकल्पनेतून भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नवसंकल्पाबाबत एक लाख पत्रे लिहिण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.श्रॉफ हायस्कूलच्या 2000 विद्यार्थ्यांनी नवसंकल्प पत्रे लिहिण्याचा उपक्रम पूर्ण केला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह यांनी मानवी मनाचे झालेले प्रदूषण धोकेदायक पातळीवर असल्याचा उल्लेख करून ‘ डिजिटल डिटॉक्स ‘ आयुष्य होण्यासाठी प्रत्येकाने आग्रही असावे असे मत मांडले. किशोर रौंदळ यांनी विद्यार्थ्यांना उपक्रमाची संकल्पना पटवून दिली.शाळेचे उपमुख्याध्यापक राजेश शाह यांनी 2000 विद्यार्थ्यांद्वारे पत्रे लिहून घेण्याच्या उपक्रमाचे समन्वयन केले. पर्यवेक्षक विद्या सिसोदिया,जगदीश पाटील तसेच सर्व वर्ग शिक्षकांनी सहकार्य केले.








