नंदुरबार l प्रतिनिधी:
राष्ट्रीय लोक अदालतीसाठी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयात जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील तडजोडपात्र प्रलंबित फौजदारी, दिवाणी, मोटार अपघात प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे, कौटूंबिक वाद तसेच दाखलपूर्व प्रकरणांंमध्ये वीज, पाणीपट्टी, घरपट्टी आदी असे तब्बल ९६८ प्रकरणे निकाली काढण्यात आले असून यातून २ कोटी ३३ लाख ७३ हजार ६६९ रुपयांची तडजोड करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश डी.व्ही.हरणे यांनी दिली आहे.
सदर लोक न्यायालयाप्रसंगी नंदुरबार मुख्यालय येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एस.तिवारी, जिल्हा न्यायाधीत-२ एम.आर.नातू, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव डी.व्ही.हरणे, मुख्य न्यायदंडाधिकारी अजित यादव उपस्थित होते. नंदुरबार मुख्यालयीन न्या.एम.आर.नातू, न्या.एस.टी.मलिये, न्या.अजित यादव, न्या.आर.एन.गायकवाड, न्या.एस.बी.मोरे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहीले. तसेच विधीज्ञ एम.के.शेख, ए.बी.कढरे, विनया मोडक, शितल गायकवाड, एच.यु.महाजन यांनी पॅनल सदस्य म्हणून काम केले.
सदर लोक न्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रभारी प्रबंधक डी.पी.सैंदाणे, नंदुरबार वकील संघाचे अध्यक्ष ॲड.पी.बी.चौधरी, जे.वाय.सानप यांनी सहकार्य केले. दरम्यान, लोक न्यायालयात ठेवण्यात आलेल्या एकूण प्रकरणांपैकी ९६८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यातील प्रलंबित प्रकरणांमध्ये दिवाणी २८ प्रकरणांचा निपटारा होऊन ४१ लाख ७५ हजार १९४ रुपये, मोटार अपघाताची १२ प्रकरणांमध्ये ६४ लाख २८ हजार, चलनक्षम धनादेशाची ३४ प्रकरणांमधून १५ लाख १० हजार ५२८, १२ फौजदारी प्रकरणांमधून ४३ हजार ४५०, इतर किरकोळ फौजदारी २३७ प्रकरणांमधून १ लाख ६१ हजार २०० अशा एकूण ३३५ प्रलंबित प्रकरणांमधून १ कोटी २३ लाख १८ हजार ३७२ रुपयांची तडजोड करण्यात आली.
तर दाखलपूर्व प्रकरणांमध्ये १०१ बॅँक वसुली प्रकरणांमधून ९८ लाख ५८ हजार ५५०, वीज थकबाकीच्या ११ प्रकरणांमधून ५१ हजार ६० तर पाणीपट्टी, घरपट्टी वसूलीच्या ४३० प्रकरणांमधून १० लाख ४७ हजार १५७ रुपये व बीएसएनएल व मोटार वाहन ई चलनाच्या ९१ प्रकरणांमधून ९८ हजार ५३० रुपयांची तडजोड करण्यात आली आहे. दाखलपूर्व ६३३ प्रकरणांचा निपटारा होऊन १ कोटी १० लाख ५५ हजार २५ रुपयांची तडजोड करण्यात आल्याचे न्या.हरणे यांनी सांगितले.