नंदुरबार l प्रतिनिधी
कापूस,सोयाबील व तांदूळ चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा तालुक्यातील बोरद येथून अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे पावणे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.यामुळे चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.
दि.८ रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसात शहादा व सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत झालेला कापुस, सोयाबीन, तांदुळ चोरी करणारे संशयित तळोदा तालुक्यातील बोरद येथील असल्याचे समजले.तसेच त्यांनी चोरी केलला कापुस, सोयाबीन व तांदुळ एका साथीदाराच्या घराच्या मागे पोत्यांमध्ये लपवून ठेवले असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला.
बोरद गावात संशयीत दिपक सतीलाल पिंपळे यास ताब्यात घेवून चोरी केलेला कापुस, सोयाबीन व तांदुळ चोरीच्या गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता त्याने सदरची चोरी त्याचे बोरद गावातीलच त्याचे साथीदार अशोक पवार, शिराफ ठाकरे व नवनाथ चव्हाण यांचे मदतीने केल्याचे सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक भरत पवार , शिराख पदम ठाकरे व नवनाथ रमण चव्हाण सर्व रा.बोरद, ता.तळोदा यांना ताब्यात घेतले. संशयितांकडून ६० हजार रुपयांची बारा क्विंटल सोयाबीन, ९५ हजारांचा कापूस, १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. याशिवाय बामखेडा जिल्हा परिषद शाळेतून चोरी तांदुळ, तुरदाळ, तेल व इतर वस्तुंबाबतचा गुन्हादेखील उघडकीस आला आहे.चौघा संशयितांना सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.