तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथे बालकामगार शोधार्थ नंदुरबार येथील कामगार विभाग व नंदुरबार जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंतर्गत तळोदा येथे विविध हॉटेल, रेस्टॉरंट,कोल्ड्रिंक्स,दुकाने यांच्यावर अचानक भेटी देऊन बाल कामगार शोध मोहीम राबविण्यात आली मात्र या मोहिमेत कुठेही बालकामगार काम करीत असतांना आढळून आले नाहीत तरी सर्व दुकान हॉटेल रेस्टरंट मालकांना समज देऊन त्यांच्याकडून हमीपत्र भरून घेण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा येथे धुळे येथील कामगार विभागाचे दुकान निरीक्षक तथा नंदूरबार जिल्हा प्रभारी बी.एस. दुकळे तसेच नंदुरबार जिल्हा महिला बाल विकास कल्याण विभाग व नंदुरबार जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथील अधिकारी संतोष निकुंबे त्याचबरोबर तळोदा येथील पोलीस उपनिरीक्षक सागर गाडीलोहार यांनी तळोदा येथील विविध हॉटेल ,रेस्टॉरंट या ठिकाणी अचानक बाल कामगार शोधार्थ भेटी दिल्या त्यामध्ये कॉलेज रस्त्यावरील हॉटेल बन्नाजी, जयमल्हार हॉटेल व मैत्रेय हॉटेल या ठिकाणी तसेच बिरसा मुंडा चौकातील गुरुदत्त रेस्टॉरंट तसेच मंगलम रेस्टॉरंट या व इतर ठिकाणी देखील भेटी दिल्या, या भेटीमध्ये कुठल्याही प्रकारचे बालकामगार त्यांना त्या ठिकाणी आढळून आले नाही.
त्यानंतर प्रत्येक आस्थापना मालकाला बालकामगार कायद्या विषयी माहिती देण्यात आली व त्यांना समज देखील देण्यात आली की, ही प्राथमिक स्वरूपाची आपल्यावर करण्यात आलेली कार्यवाही होती. परंतु यानंतर जी कार्यवाही होईल त्या कार्यवाहीत आपल्या हॉटेल किंवा दुकानात कुठल्याही प्रकारचे बाल कामगार आढळून आले तर बालकामगार कायद्या अंतर्गत आपणावर कार्यवाही करण्यात येईल अशी सूचनाही त्यांना त्या ठिकाणी देण्यात आली त्याबरोबर त्यांच्याकडून बालकामगार न ठेवण्याबाबतचे हमीपत्र देखील लिहून घेण्यात आले. त्याचबरोबर दुकानात ‘येथे बाल कामगार काम करीत नाहीत’ या बाबतचे स्टिकर देखील लावण्यात आले. अचानक शासकीय वाहन दुकानासमोर आल्याने हॉटेल मालकांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आली.








