नंदुरबार l प्रतिनिधी
म्हसावद- धडगांव रस्त्यावर दारु बनविण्यासाठी लागणाऱ्या अवैध स्पिरीट वाहतूकीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करीत 585 लीटर स्पिरीटसह 10 लाख 4 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अधिक माहिती अशी की, 6 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, म्हसावद ता. शहादा मार्गे धडगांव येथे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनातून अवैध दारु बनविन्याकामी उपयोगी पडणारे व मानवी शरीरास अपायकारक असलले स्पिरीटची चोरटी वाहतूक करणार आहेत. त्यावरून पोलीस अधीक्षक यांनी सदर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना देवून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.
मिळालेल्या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील दरा गावाच्या पुढे उनपदेव फाट्याजवळ सापळा रचला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक म्हसावद गावाकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना सकाळी 10.30 वा. सुमारास एक पांढऱ्या रंगाचे मोठे चारचाकी वाहन भरधाव वेगाने येतांना दिसले, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हात देवून वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघून गेले,
म्हणून पथकाला संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग केला. वाहन चालकाने सदरचे वाहन उनपदेव डॅमजवळ सोडून तेथून पळून गेले. सदरच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात 2 लाख 04 हजार 750 रुपये किमतीच्या 09 प्लास्टीकच्या गोण्या त्यात प्रत्येकी 13 असे एकूण 117 पाऊच त्यात एकुण 585 लीटर दारु बनविणेकामी उपयोगी पडणारे स्पिरीट.8 लाख रुपये किमतीची एक पांढ-या रंगाची महिंद्रा बोलेरो वाहन क्रमांक ( MH-12 EG-4773 ) असा एकुण 10 लाख 04 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने कायदेशीर प्रक्रिया करुन सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन सोडून पळून गेलेले संशयीत आरोपीतांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात भादवी कलम 328 (मानवी शरीरास अपायकारक पदार्थ निर्मित करणे), महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108 सह प्रमाणे महाराष्ट्र मोटार वाहन कायदा कलम 239 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे, पोलीस हवालदार बहादुर भिलाला, पोलीस नाईक विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, अविनाश चव्हाण, दादाभाऊ साबळे, योगेश कोळी, पोलीस अंमलदार दिपक न्हावी, अभिमन्यु गावीत यांच्या पथकाने केली आहे.








