नंदुरबार l प्रतिनिधी-
संत निरंकारी मंडळ (दिल्ली) चे प्रमुख सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आशिर्वादाने व प.पु. हिरालाल पाटील (झोनल इंचार्ज-धुळे) यांचे मार्गदर्शनाने रविवार, दि.१० डिसेंबर २०२३ रोजी येथे झोनस्तरीय ‘४४ व्या खान्देश निरंकारी सत्संग समारोहाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा सत्संग समारोह निरंकारी भक्तांचा आध्यात्मिक मेळावा असून त्यातून निरंकारी मिशनचा सत्यसंदेश देवून मानवी जीवनात आध्यात्मिक जाग्रुतीद्वारे परमेश्वराची प्राप्ती व त्यानंतर च्या भक्तीचे महत्त्व सांगण्यात येईल. या सत्संग समारोहाला नंदुरबारसह धुळे, जळगाव, नासिक जिल्ह्यातील व लगतच्या गुजरात व मध्यप्रदेशातील हजारो निरंकारी भक्तांची मांदियाळी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती नंदुरबार येथील संत निरंकारी मंडळाचे ब्रांच मुखी पुंडलिक निकुंभे यांनी दिली आहे.
नंदुरबार येथे संत निरंकारी मंडळाच्या वतीने दि.५ डिसेंबर २०२३ रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रपरिषदेत संत निरंकारी मंडळाचे ब्रांच मुखी पुंडलिक निकुंभे यांनी सांगितले की, संत निरंकारी मंडळ (दिल्ली) या वैश्विक मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराजांच्या सत्संगातून विश्वातील मानवमात्राला परमेश्वराची ओळख, विश्वबंधुत्वाची शिकवण देऊन मानवी मुल्यांचा संदेश दिला जातो. या संदेशातूनच जगभरातील लाखो-करोडो बंधू-भगिणी हे संत निरंकारी मंडळाशी जोडले गेले आहेत. यावर्षीच्या ४४ व्या खान्देश निरंकारी सत्संग समारोहचे यजमानपद नंदुरबार जिल्ह्यास मिळाले आहे. या समारोहाची तयारी उत्साहात सुरु असून येत्या रविवारी दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सत्संग समारोहाचे नंदुरबार येथील सुजय हॉस्पीटलसमोरील तांबोळी बारी चौक, ग्रीन पार्कच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत आयोजन केले आहे. या खान्देश सत्संग समारोहास संत निरंकारी मंडळाचे मराठी एक नजर पाक्षिक पत्रिकेचे संपादक कैलास कुटे (मुंबई) यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
याठिकाणी सत्संग समारोहाचा भव्य मंडप उभारण्यात आला असून सत्संग-प्रवचन या समारोहामध्ये होतील. या समारोहकरीता येणार्या भक्तगणांकरीता सर्वसोयी सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच सत्संग समारोहानंतर लंगर महाप्रसादाचा व ज्ञानदानाचा कार्यक्रम ही होईल. या सत्संग समारोहाला निरंकारी भक्तांसह अध्यात्म प्रेमी बंधू-भगिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संत निरंकारी मंडळ, झोन धुळेचे झोनल इंचार्ज हिरालाल पाटील, नंदुरबारचे ब्रांच मुखी पुंडलिक निकुंभे यांनी केले आहे.