नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर मनोरुग्ण तरुण रेल्वेला पुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या वाहिनीवर चढल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने रेल्वे सेवा तासभर विस्कळीत झाली होती.
अधिक माहिती अशी की, नंदुरबार रेल्वे स्थानकावर एका मनोरुग्णामुळे ठप्प झालेली रेल्वे वाहतूक तब्बल एक तासानंतर सुरळीत सुरू झाली. मनोरुग्ण व्यक्ती रेल्वेच्या मुख्य वीज वितरण वाहिनीवरवर चढल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होतो. भुसावळ ते सुरत दरम्यान रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आलेली होती.
वीज पुरवठा खंडित असल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल झालेत. शर्तीचे प्रयत्न करून मनोरुग्णाला रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांनी वीज वाहिनीवरून खाली उतरवले.सुमारे एक तासानंतर रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली.
दरम्यान सुरुवातीला मनोरुग्ण ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने प्रशासनाची काही काळ चांगलीच तारांबळ उडल्याचे दिसून आले.मात्र,अथक परिश्रमानंतर मनोरुग्णाला उतरविण्यात यश आल्याने सुटकेचा सुस्कारा सोडला.या घटनेने मात्र रेल्वे स्थानकावर चांगलीच खळबळ माजली होती.